S M L

'जन धन योजने'चा शुभारंभ, पहिल्याच दिवशी 1.5 कोटी खाती उघडली

Samruddha Bhambure | Updated On: Aug 28, 2014 09:05 PM IST

'जन धन योजने'चा शुभारंभ, पहिल्याच दिवशी 1.5 कोटी खाती उघडली

jan dhan yojana pm modi

28 ऑगस्ट : श्रीमंती आणि गरिबांमधील दरी दूर करणार असा निर्धार करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी जन धन योजनेचं नवी दिल्लीत उद्घाटन झालं. यावेळी पंतप्रधानांनी देशातील आर्थिकदृष्ट्या अस्पृश्य मोडीत काढून देशाची आर्थिक व्यवस्था आणखी बळकट करू असा विश्वास व्यक्त केला आहे. जनधन योजनेचं उद्घाटन करत नरेंद्र मोदींनी 26 जानेवारी 2015 पर्यंतच्या खातेदारांना 1 लाख रुपयांचा अपघात विम्याबरोबरच 30 हजार रुपयांचा जीवनविमाही देणार असल्याची घोषणाही केली आहे. आज पहिल्याच दिवशी 1.5 कोटी लोकांनी बँक खाती उघडली असल्याचंही मोदींनी सांगितलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या भाषणात घोषणा केल्याप्रमाणे आज ती घोषणा त्यांनी सत्यात उतरवली. नवी दिल्ली, मुंबई, नागपूरमध्ये एकाच वेळी या योजनेचं उद्घाटन करण्यात आलंय. नवी दिल्लीत नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ करण्यात आलं. यावेळी जन धन योजना ही देशाच्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी हे एक महत्वाचं पाऊल आहे. प्रत्येक व्यक्तीला

अर्थव्यवस्थेसोबत जोडला गेला पाहिजे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला एक लाखांचा अपघात विमा देण्यात येणार आहे. आजही देशाचा मोठा हिस्सा बँकेच्या सुविधेपासून वंचित आहे. आर्थिकदृष्ट्या अस्पृश्य असलेल्या सर्वांना बँकेचा फायदा मिळवून द्यायचा आहे असा निर्धार पंतप्रधानांनी व्यक्त केला.

गरिबांनासुद्धा डेबिट कार्ड देणार -मोदी

तसंच देशातली सावकारी पद्धत मोडीत निघावी त्यामुळे बँकेकडून शेतकर्‍यांना थेट कर्ज घेण्यास सोईच जाईल. आज अनेक शेतकरी आत्महत्या करत आहे. ही अत्यंत दुखाची बाब आहे. या योजनेमुळे शेतकर्‍यांच्या आत्महत्यांना आळा बसेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारतीय रुपया मजबूत करण्याचं आमचं स्वप्न असून या योजनेच्या माध्यमातून बँकेतर्फे देशातील प्रत्येक गरिबांनासुद्धा डेबिट कार्ड देणार आहोत. येत्या 26 जानेवारी 2015 पर्यंतच्या खातेदारांना 1 लाख रुपयांचा अपघात विम्याबरोबरच 30 हजार रुपयांचा जीवनविमाही देण्यात येईल. त्यामुळे घरातलं कुणी आजारी पडल्यास हे पैसे उपयोगी पडतील असंही मोदी म्हणाले.

स्वत: पाच लाख ईमेल केले -मोदी

आज पहिल्याच दिवशी तब्बल 1.5 कोटी लोकांचा अपघात विमा उतरवण्याचा विक्रम आज आपण केला आहे. आजच्याच दिवसांत 1.5 कोटी लोकांनी बँक खाती उघडली असून आत्तापर्यंत इतिहासात एका दिवसांत इतकी खाती कधीही उघडली गेलेली नाहीत अशी माहितीही मोदींनी दिली. यासाठी आपण स्वत:  पाच लाख ईमेल केले आहे. आजपर्यंत देशातला कोणत्याही पंतप्रधानाने पहिल्यांदाच असं केलं असावं असंही ते म्हणाले. 26 जानेवारीपर्यंत आपण आपलं लक्ष पूर्ण करू यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असं आवाहनही मोदींनी केलं.

अशी आहे जन धन योजना

- 7.5 कोटी कुटुंबांपर्यंत योजना पोहोचवण्याचं उद्दिष्ट

- 15 ऑगस्ट 2015 ते 15 ऑगस्ट 2016 योजनेचा पहिला टप्पा

- पहिल्या टप्प्यात या योजनेअंतर्गत लोकांना खातं उघडून देणार

- दुसर्‍या टप्प्यात डायरेक्ट ट्रान्स्फर कॅश योजना या कुटुंबांसाठी लागू करणार

- सबसिडीसोबत 1 लाख रुपयांचा विमा देणार

- प्रत्येक कटुंबाला या विम्याच्या कक्षेत आणणार

- 20 कोटी लोकांना योजनेचा लाभ होणार

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 28, 2014 04:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close