S M L

खेळा, वाचा आणि मोठी स्वप्नं पाहा, मोदी सरांचा गुरुमंत्र

Sachin Salve | Updated On: Sep 6, 2014 12:40 PM IST

खेळा, वाचा आणि मोठी स्वप्नं पाहा, मोदी सरांचा गुरुमंत्र

05 सप्टेंबर : लहाणपणी  दंगा-मस्ती केलीच पाहिजे, तो त्यांचा हक्क आहे पण मुलांनी खेळलं पाहिजे, महापुरुषांचं जीवनचरित्रं वाचलं पाहिजे, काहीतरी बनण्यापेक्षा काहीतरी करण्याचे स्वप्न पाहावीत असा गुरूमंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरातील विद्यार्थ्यांना दिला. शिक्षकदिनी नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतून देशभरातल्या विद्यार्थी आणि शिक्षकांशी मनमोकळा संवाद साधला. तब्बल पावणे दोन तास मोदी गुरुजींचा तास सुरू होता. यावेळी मोदींनी आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देत विद्यार्थ्यांची मन जिंकून घेतली. यावेळी मोदींच्या हस्ते 'स्वच्छ भारत, स्वच्छ विद्यालय' योजनेचा शुभारंभही करण्यात आला.

स्वयंसेवक,  भाजपचे नेते, गुजरातचे मुख्यमंत्री, भाजपच्या विजयाचे शिल्पकार आणि पंतप्रधान अशा ना ना रुपात आजपर्यंत नरेंद्र मोदींना सगळ्यांनी पाहिलं आणि ऐकलं. पण आज नरेंद्र मोदी एका शिक्षकाच्या आणि विद्यार्थी प्रिय पंतप्रधानांच्या भूमिकेत पाहण्यास मिळाले. विद्यार्थ्यांच्या बालबोध, अल्लड, अवखळ प्रश्नांना मोदींनी पंतप्रधान म्हणून नाहीतर वर्गमित्र म्हणून उत्तर देताना पाहण्यास मिळाले आणि निमित्त होतं शिक्षक दिनाचं. दिल्लीतील माणेकशॉ सेंटर हॉलमध्ये विद्यार्थीमय कार्यक्रमात मोदींनी देशभरातील लाखो विद्यार्थ्यांनी संवाद साधला. सुरुवातीला विद्यार्थी आणि शिक्षकांना उद्देशून मोदींनी भाषण केलं. त्यानंतर देशभरातल्या विद्यार्थ्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मोदी सरांना प्रश्न विचारले. यावेळी मोदींनी त्यांच्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरं दिली. सरकारमध्ये तुम्ही हेडमास्तरच्या भूमिकेत आहात का, असा प्रश्न त्यांना एका विद्यार्थिनीनं विचारला. त्यावर आपण टास्कमास्टर असल्याचं मोदींनी सांगितलं. शिक्षणासोबतच खेळ, व्यायाम आणि स्वच्छतेवर त्यांनी भर दिला.

जीवनचरित्रं वाचा

विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तकांचा अभ्यासा व्यतिरिक्त वेगवेगळ्या विषयांची पुस्तक वाचली पाहिजे. वाचन हे खूप महत्त्वाचं आहे, वाचन तुमचा बौद्धिक विकास करतं. त्यामुळे महापुरुषांचे जीवनचरित्र वाचा त्यामुळे इतिहासासोबत आपली गाठ पक्की होते. पण हे गरजेचं नाही की तुम्ही सगळी जीवनचरित्र वाचली पाहिजे. जर तुम्हाला खेळात, सिनेमा, व्यापार, विज्ञान क्षेत्रात प्रगती करायचीय असेल तर त्या क्षेत्रातील व्यक्तींचे जीवनचरित्र वाचा असा वडिलकीचा सल्लाही मोदींनी दिला. हसत- खेळत राहा, आज मुलं लवकर मोठी होतात त्यामुळे तुमच्यातलं मूल कधी मरू देऊ नका अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. तसंच फक्त डिग्री मिळवून उपयोग नाही, तुमच्याकडे चांगलं कौशल्य हवंय असंही ते म्हणाले. मोदींनी आपल्या भाषणात विनोबा भावे आणि दादा धर्माधिकारी यांचा गौरवानं उल्लेखही केला. कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर मोदींनी स्टेजवरुन खाली उतरून विद्यार्थ्यांशी हस्तादोलन केलं. त्यामुळे विद्यार्थी आणखी भारावून गेले.

विद्यार्थ्यांची प्रश्न आणि मोदी

पंतप्रधान झाल्यानंतर तुम्हाला कसं वाटतं असा सवाल एका विद्यार्थिनीने विचारला असता, मोदी म्हणाले, पंतप्रधान झाल्यावर जबाबदार्‍या वाढल्या आहेत, तोंडातून एकही चुकीचा शब्द उच्चारला जाऊ नये याकडेही लक्ष द्यावं लागतं. मी खूप सामान्य कुटुंबातून आलोय. त्यामुळे कधी पंतप्रधान होईन असा विचार केला नव्हता. पण कुणी मोठ्ठा माणूस होण्याचं स्वप्न पाहण्यापेक्षा मोठ्ठं काम करण्याचं स्वप्न बघा. मी शाळेत असताना साधी मॉनिटरची निवडणूक सुद्धा लढवली नाही असंही मोदी म्हणाले.

जपान दौर्‍यातील आठवणी

मी आताच जपान दौर्‍यावर जाऊन आलो तिथल्या शाळा कशा आहेत हे मी आवर्जून पाहिलं. त्यांच्या शाळेत शिस्त आणि स्वच्छतेला खूप महत्त्व आहे. तिथे लोक विज्ञान-तंत्रज्ञानाचा खूप चांगला वापर करतात. सर्वांना आदर देण्याचा जपानच्या लोकांचा गूण आवडला असंही मोदी म्हणाले.

पंतप्रधान होण्यासाठी काय करावं लागेल ?

असा प्रश्न एका विद्यार्थिनीने विचारला असता, मोदी सुरुवातील हसले...चला तुम्ही पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उतरणार असाल तर मला अजून 10 वर्ष तरी चिंता नाही असं म्हणताच सभागृहात एकच हशा पिकली. पण तुम्ही उद्याचं भविष्य आहात तुम्ही नक्की पंतप्रधान व्हावं अशी माझी इच्छा आहे. जेव्हा कधी पंतप्रधान व्हाल तेव्हा मला शपथविधीला बोलवा मी नक्की येईल असं दिलखुलास उत्तरही मोदींनी दिलं.

'मी, टास्कमास्टर'

सरकारमध्ये तुम्ही हेडमास्तरच्या भूमिकेत आहात का ?, असा प्रश्न एका विद्यार्थ्याने विचारला असता मोदी म्हणाले, कामं वेळेवर झाली पाहिजे यासाठी माझा नेहमी आग्रह असतो. मी शिस्तप्रिय आहे, पण ती शिस्त मी स्वत:लाही लागू करुन घेतो. माझ्यासोबत काम करणारे कर्मचारी जर 10 तास काम करत असतील तर मी 12 तास काम करतो. त्यांच्यापेक्षा जास्त काम करण्याची माझी तयारी असते. मी इथं हेडमास्टर तर नाही पण टास्कमास्टर नक्की आहे असं उत्तर मोदींनी दिलं.

जर मी शिक्षक असतो तर...

जर मी शिक्षक असतो तर विद्यार्थ्याच्या क्षमतेवर कधीच निवड केली नसती. सगळे विद्यार्थी माझ्यासाठी एक समान असते. एकच विद्यार्थी परीपूर्ण नसतो. त्यातही अवगूण असता पण त्याच्यातील चांगले गूण हेरून त्याला प्रोत्साहन दिले पाहिजे. हुशार आणि सर्वसाधारण विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकांनी कधीच फरक करू नये. सर्व विद्यार्थ्यांना समजेल अशा प्रकारे समजावून सांगावं असा सल्लाही मोदींनी शिक्षकांना दिला.

मी लहान होतो तेव्हा...

एका विद्यार्थ्याने मोठ्या धाडसाने आपल्या शैलीत तुम्ही लहानपणी खोडकर होता का ? असा थेट प्रश्नच मोदींना विचारला. मोदींनीही हा प्रश्न जरा अवघडच आहे. पण सांगतो, मी लहाणपणी खूप खोडकर होतो. आमच्या गावी जेव्हा एखादं लग्न असलं तर आम्ही तिथे खूप धमाल करायचो. लग्नात सनई वाजवणारी मंडळी बसलेली असायची. मग आम्ही त्यांना चिडवण्यासाठी त्यांच्यासमोरच चिंच खायचो त्यामुळे आता तुम्ही अंदाज करा जर तुमच्या समोर जर कुणी चिंच खात असेल तर काय होतं ? मग काय ते सनई वाजवणारे आम्हाला मारण्यासाठी उठायचे आणि आम्ही धूम ठोकून पळून जायचो असा बालपणीचा किस्सा मोदींनी सांगताच विद्यार्थ्यांना हसूच अवरले नाही. एवढंच नाहीतर मोदींनी आणखी एक किस्सा सांगितला. मी आणि माझे मित्र कुणाच्याही लग्नात जायचो. आमच्या सोबत एक स्टेपलर असायचं. लग्नात दोन माणसं बसलेली असेल तर आम्ही चुपचाप मागे जायचो आणि त्यांच्या कुर्त्याला जोडून त्यावर स्टेपल करायचो मग जेव्हा ती लोकं उठायची मग काय व्ह्याचं त्याचा अंदाज तुम्हाला आलाच असेल. पण तुम्ही असं काही करू नका असं प्रॉमिसही त्यांनी विद्यार्थ्यांकडून घेतलं.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 5, 2014 06:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close