S M L

भाजपची नरमाई, सेनेला केंद्रीय मंत्रिपदाची ऑफर

Sachin Salve | Updated On: Nov 6, 2014 11:25 PM IST

uddhav_sena_ledar3206 नोव्हेंबर : शिवसेना सत्तेत सहभागी होणार की नाही यावरुन सुरू असलेल्या चर्चेला आता पूर्णविराम मिळण्याची चिन्ह आहे. भाजपने शिवसेनेच्या मागण्यांपुढे नरमाईची भूमिका घेतली असून आठवड्याच्या शेवटी होणार्‍या केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेला स्थान मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. याबाबत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भाजपचे अध्यक्ष अमित शहांनी फोन केल्याचंही सूत्रांनी सांगितलंय.

आधी विश्वासदर्शक ठराव आणि मग मंत्रिमंडळाचा विस्तार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केल्यानंतर शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेत विरोधी बाकावर बसण्याची तयारी दर्शवली. याबाबतच आज शिवसेना भवनात पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत सेना नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत निर्णयाचे अधिकार उद्धव ठाकरेंना देण्यात आलेत. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात सेनेला आणखी एक पद मिळावं अशी मागणी शिवसेनेनं केली. तर महाराष्ट्रात आधी शपथ आणि मग विश्वासदर्शक ठराव अशी भूमिका शिवसेनेनं कायम ठेवलीये. विश्वासदर्शक ठरावापूर्वी सेनेच्या काही नेत्यांना मंत्रिपदाची शपथ द्यावी या मागणीवरुन शिवसेना मागे हटायला तयार नाहीये. सेनेच्या भूमिकेनंतर थेट दिल्लीतून सूत्रं फिरली. भाजपचे अध्यक्ष अमित शहांनी उद्धव ठाकरेंना फोन करून केंद्रीय मंत्रिमंडळात आणखी एक मंत्रिपद देण्याची तयारी दर्शवली. तसंच दिल्लीतल्या भाजप नेतृत्वाची सेनेसोबत चर्चा सुरू आहे आणि सर्व काही ठीक होईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. आता केंद्रात संबंध सुधारल्यानंतर आता राज्यात सेना काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 6, 2014 11:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close