S M L

हिसार परिसरात तणाव अद्यापही कायम

Samruddha Bhambure | Updated On: Nov 19, 2014 03:12 PM IST

हिसार परिसरात तणाव अद्यापही कायम

19 नोव्हेंबर :  अजामीनपात्र वॉरंट टाळण्यासाठी आश्रमात लपून बसलेले हरियाणातील स्वयंघोषित गुरू बाबा रामपाल याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर रामपाल समर्थकांनी काल (मंगळवारी) जोरदार गोळीबार आणि दगडफेक केली आहे. पोलिसांनी आश्रमाला वेढा घातला असून आश्रमातलं पाणी आणि वीज बंद करण्यात आली आहे. तसंच समर्थकांना आश्रम परिसर रिकामा करायला सांगितलं आहे. त्यामुळे आज सकाळपासूनचं आश्रम परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.

रामपालच्या आश्रमात 2006 मध्ये एक खून झाला होता. या हत्येचा कट रचल्याचा गुन्हा रामपालवर दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कोर्टात हजर राहण्याचे आदेश देऊनही रामपाल तीन वेळा गैरहजर राहिला. अखेर पंजाब-हरियाणा हायकोर्टाने बाबा रामपालविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केला. रामपालला शरण येण्याचं आवाहनही पोलिसांनी केलं होतं. हे अटकनाट्य रामपालच्या शरणागतीशिवाय संपणार नाही, असा निर्धार आता पोलिसांनी केला आहे.

बाबा रामपाल याचे अनेक समर्थक आश्रमात असल्याचा पोलिसांना संशय आहे. आश्रमात महिला आणि लहान मुलांची मोठी संख्या असल्याने पोलिसांनी अश्रुधुराची नळकांडी फोडून तसंच पाण्याचे फवारे मारत आणि हवेत गोळीबार करत रामपाल समर्थकांना पांगविण्याचा प्रयत्न केला. पण रामपाल यांनी महिला आणि लहान मुलांना ढाल बनवण्याचे प्रयत्न सुरू केले असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. त्यात आश्रमातून दगडफेक, गोळीबार तसेच पेट्रोल बॉम्बफेक झाल्याने जवान आणि काही पत्रकार जखमी झाले आहेत.

रामपालच्या या आश्रमात अनेक सामान्य नागरिकही आहेत. त्यामुळे रामपालला अटक केल्यानंतरच हे ऑपरेशन संपेल, त्यासाठी गरज पडल्यास क्रेनच्या साहाय्यानं आश्रमाची भिंत पाडू, असा इशारा हरियाणाच्या डीजीपींनी दिला आहे.


Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 19, 2014 08:40 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close