S M L

गुंतवणुकीसाठी मोदींचा 3D फॉर्म्यूला

Samruddha Bhambure | Updated On: Jan 13, 2015 01:54 PM IST

गुंतवणुकीसाठी मोदींचा 3D फॉर्म्यूला

11 जानेवारी : भारत गुंतवणुकीसाठी योग्य ठिकाण आहे आणि आम्ही उद्योजकपूरक असल्याचं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरातल्या उद्योजकांना भारतात गुंतवणुकीचं आवाहन केलं. गांधीनगरमध्ये भरलेल्या सातव्या व्हायब्रंट गुजरात परिषदेत ते बोलत होते. भारतात लोकशाही म्हणजे डेमोक्रसी, लोकसंख्या म्हणजे डेमोग्राफी आणि मागणी म्हणजेच डिमांड हे थ्रीडी आहे. इतकंच नाही तर प्रत्यक्षात उतरण्याची वाट पाहत असलेली अनेक स्वप्नं आमच्याकडे आहेत, असंही मोदी म्हणाले. देशाच्या अर्थव्यवस्थेच्या पुनरुज्जीवनासाठी माझं सरकार पहिल्या दिवसापासून प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलं.

गुजरात इथल्या गांधीनगरमध्ये उद्योजकांसाठी 'व्हायब्रंट गुजरात समीट 2015' या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधानांनी आज (रविवारी) या परिषदेचे उद्घाटन केले. या परिषदेत जगभरातील उद्योजक सहभागी झाले आहेत. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी, संयुक्त राष्ट्राचे महासचिव बान की मून आदी मान्यवर मंडळी उपस्थित आहेत. या समीटच्या माध्यमातून 12 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची अपेक्षा आहे.

विकासाला चालना मिळावी, यासाठी राज्य आणि केंद्र पातळीवर एक खिडकी योजना सुरू करण्याचा आमचा मानस आहे. आम्ही केवळ घोषणा करत नाही तर त्याला ठोस कृतीचीही साथ देतो, असंही मोदींनी यावेळी सांगितलं. आपल्या या भाषणात त्यांनी स्मार्ट शहरं आणि जागतिक दर्जाच्या सुविधा देण्याचं जे आश्वासन निवडणूक प्रचारात दिलं होतं, त्याचा पुनरुच्चार केला. जागतिक अर्थव्यवस्थेवर भाष्य करताना समस्येकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलायला हवा, असं मोदींनी म्हटलंं. मंदीला आपण उद्योग आणि व्यापार्‍याशी जोडूनच बघतो. पण जागतिक लोकसंख्येत मोठा वाटा असलेल्या देशांमधलं दरडोई उत्पन्न घसरल्यानं मंदीची समस्या उभी राहते, याचा आपण कधी विचार केला आहे का, असा सवाल मोदींनी विचारला.

इथे एखाद्याचं स्वप्न एखाद्याच्या कृतीवर अवलंबून आहे. त्यामुळे आपण एक कुटुंब आहोत. वसुधैव कुटुंबकम् यावर भारताचा कायमच विश्वास राहिलाय, अशी भावनिक सादही पंतप्रधान मोदींनी घातली. तीन दिवस चालणार्‍या या परिषदेला संयुक्त राष्ट्र महासंघाचे सरचिटणीस बान की मून, अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांच्यासह भारतासह अनेक जागतिक कंपन्यांच्या प्रमुखांनी उपस्थिती लावलीय.

रिलायन्स गुजरातमध्ये 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक

'मेक इन इंडिया' आणि 'डिजिटल इंडिया' या मोहिमेमुळे देशभरात एक नवीन उत्साह आल्याचे सांगत रिलायन्स इंडस्ट्रीजचे सीएमडी मुकेश अंबानी यांनी गुजरातमध्ये पुढच्या 5 वर्षांत 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. भारताची अर्थव्यवस्था वेगाने विकासाच्या वाटेवर जाईल अशी आशा मुकेश अंबानी यांनी यावेळी व्यक्त केली. आदित्य बिर्ला समूहाचे कुमारमंगलम् बिर्ला यांनीदेखील गुजरातमध्ये सिमेंट आणि अन्य उद्योगांच्या विस्तारासाठी 20 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली.

मोदींचा प्रवासही ओबामांसारखा - केरी

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी फ्रान्समधल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत भाषणाची सुरुवात केली. 'दहशतवाद हा स्वातंत्र्याला लगाम घालू शकत नाही' असं ते म्हणाले. केरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतिसुमने उधळली. मोदींचा रेल्वेमध्ये चहा विकण्यापासून 7 रेसकोर्स रोडपर्यंतचा प्रवास हा ओबामांप्रमाणेच असल्याचं केरी म्हणाले. त्याचबरोबर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा प्रजासत्ताक दिनानिमीत्त भारतात येण्यासाठी उत्सुक असल्याचंही त्यांनी सांगितलं.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 11, 2015 08:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close