S M L

कोंडी फुटली, अणुकरारावर अमेरिका सहमत

Sachin Salve | Updated On: Jan 25, 2015 10:05 PM IST

कोंडी फुटली, अणुकरारावर अमेरिका सहमत

25 जानेवारी : भारत आणि अमेरिकेच्या नव्या पर्वाला शानदार सुरूवात झालीये. भारतासाठी महत्वपूर्ण अशा अणुकराराच्या मुद्यावर अखेर अमेरिकेनं नरमाईची भूमिका घेतलीये. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांनी अणुकराराच्या मुद्यावर कोणतही ठोस आश्वासन दिलं नाही पण गेल्या कित्येक दिवसांची कोंडी फुटली असून यावर आणखी चर्चा होणं गरजेचं आहे असं सांगत ओबामांनी सकारात्मक संकेत दिले आहे. ओबामा आणि मोदी यांच्यात द्विपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीनंतर संयुक्त पत्रकार परिषदेत दोन्ही नेत्यांनी दहशतवादाविरोधात लढण्यासाठी साह्य करणार अशी ग्वाही दिली.

अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आजपासून भारताच्या तीन दिवस दौर्‍यावर आले आहेत. 'अतिथी देवो भव:' म्हणत ओबामांचं शानदार स्वागत करण्यात आलं. यानंतर बराक ओबामा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात हैदराबाद हाऊसमध्ये द्विपक्षीय बैठक पार पडली. त्याअगोदर ओबामा आणि मोदी यांच्यामध्ये 'चाय पे चर्चा'ही झाली. या बैठकीनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन निवेदन सादर केलं. अमेरिका आणि भारत हे दोन्ही देश नैसर्गिक मित्र आहे. ओबामांच्या भेटीमुळे आपल्याला नवी ऊर्जा मिळालीये. ओबामांनी प्रजासत्ताक दिनाचं निमंत्रण स्विकारलं हा आमचा सन्मान आहे असे गौरवद्गार मोदींनी काढले. तसंच भारत आणि अमेरिकेदरम्यान नागरी अणुकरारावर गेल्या 4 महिन्यांपासून चर्चा सुरू आहे. भारताकडून सर्व सहकार्य दिलं जाईल. अमेरिकेकडून आम्हाला आर्थिक क्षेत्रात जास्त सहकार्य व्हावं अशी अपेक्षा मोदींनी व्यक्त केली. त्याचबरोबर दहशतवादाचा जगाला धोका आहे. दहशतवादाला थारा नसून दोन्ही देश याविरोधात लढा देणार असं मोदींनी यावेळी स्पष्ट केलं.

'मेरा प्यारभरा नमस्कार'

यावेळी ओबामांनी आपलं हिंदीप्रेम व्यक्त केलं. ओबामांनी आपल्या निवेदनाची सुरूवात 'नमस्ते, मेरा प्यारभरा नमस्कार' असं म्हणत करून भारतीयांची मन जिंकली. भारताकडून मिळलेला सन्मान आणि प्रजासत्ताक दिनाच्या निमंत्रणाबद्दल ओबामांनी सर्वप्रथम मोदींचे आभार मानले. नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व कणखर आहे. मोदींच्या ऊर्जा आणि महत्वकांक्षेमुळे मी प्रभावित झालोय अशी स्तुतीसुमनं ओबामांनी उधळली. तसंच अमेरिकेच्या दौर्‍यावर असतांना मॅडिसन स्केअरमध्ये मोदींचं बॉलिवूडच्या स्टार प्रमाणं स्वागत झालं अशी कोपरखळीही ओबामांनी लगावली. दोन्ही देशामध्ये व्यापारात 60 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ही चांगली गोष्ट असून यापुढेही आमचं सहकार्य कायम मिळत राहिलं. कित्येक दिवसांपासून रखडेलेल्या अणुकराराच्या मुद्यावर दोन्ही देशात चर्चा झालीये. याला नव्याने चालना मिळाली असून पण आणखी चर्चा सुरू राहणार असं ओबामांनी स्पष्ट केलं. व्यवसाय,संरक्षण, नगरविकास,उत्पादन, सौरऊर्जा,अणुऊर्जा या क्षेत्रात भारतासोबत काम करणार अशी ग्वाही ओबामांनी दिली. चले साथ साथ असं म्हणत ओबामांनी आपल्या निवेदनाची सांगता केली.

ओबामांची रशियावर टीका

यानंतर पत्रकारांच्या प्रश्नांना दोन्ही नेत्यांनी दिलखुलास उत्तर दिली. मोदींनी चाय पे चर्चेसाठी बोलावलं त्याबद्दल ओबामांनी आभार मानले आणि मंगळवारी होणार्‍या 'मन की बात' कार्यक्रमासाठी आपण उत्सुक आहोत असं ओबामा म्हणाले. यावेळी ओबामांनी रशियावर टीका केली. युक्रेनमध्ये दहशतवादाला प्रोत्साहन देण्याचं काम रशियाच करत आहे अशी टीका ओबामांनी केली.

मोदींनी केला ओबामांचा ऐकेरी उल्लेख

आमच्यामध्ये चांगली केमेस्ट्री जुळून आलीये त्यामुळे आम्ही तर जवळ आलोच पण वॉश्ग्टिंन आणि दिल्लीही जवळ आली. बराक आणि माझ्यात मित्रत्वाचं नातं आहे. दोन्ही देशांचे संबंध हे नेत्यांच्या संबंधांवर अवलंबून असतात असं सांगत मोदींनी ओबामांचा मित्रत्वानं ऐकेरी उल्लेख केला. तसंच चीन आणि अमेरिकेदरम्यानच्या क्लायमेंट चेंज करारावर मोदींनी परखड मत व्यक्त केलं. आमच्यावर कुणाचाही दबाव नाही आणि कुणी दबावही टाकू शकत नाही असं मोदींचं ठणकावून सांगितलं.

भारत-अमेरिका अणुकरार अखेर मार्गी

ओबामा आणि मोदी यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेच्या नंतर भारत-अमेरिका अणुकरार अखेर मार्गी लागलाय अशी माहिती परराष्ट्र खात्याच्या सचिव सुजाता सिंह यांनी दिलीये. 2008मध्ये संसदेनं अणुदायित्व विधेयकाला मंजुरी दिल्यानंतर या कराराच्या अंमलबजावणीत अडथळे निर्माण झाले होते. ही कोंडी फोडण्यासाठी गेल्या 4 महिन्यांपासून चर्चा सुरू होती. अखेर त्यातून मार्ग निघाल्याचं सुजाता सिंह यांनी सांगितलंय. त्यानुसार नागरी अणु दायित्वावर दोन्ही देशांमध्ये सहमती झालीये.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 25, 2015 06:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close