S M L

राजपथावर नारी शक्तीचा जागर; लष्करी सामर्थ्याचं दर्शन

Sachin Salve | Updated On: Jan 26, 2015 07:29 PM IST

राजपथावर नारी शक्तीचा जागर; लष्करी सामर्थ्याचं दर्शन

26 जानेवारी : आज 26 जानेवारी...भारताचा प्रजासत्ताक दिन. राजपथावर आज दिमाखदार संचलन झालं. 66 वर्षांपूर्वी याच दिवशी भारतानं स्वत:ची अशी एक राज्यघटना निर्माण केली. आणि लोकांच्या सार्वभौमत्वाची घोषणा केली. आज झालेल्या सोहळ्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे प्रमुख पाहुणे होते. त्यामुळे या सोहळ्याला वेगळं महत्वप्राप्त झालं. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संपूर्ण मंत्रिमंडळ, वरिष्ठ अधिकारी सोहळ्याला उपस्थिती होते. 'याची देही याचा डोळा' असाच हा संचलन सोहळा पार पडला. राजपथावर जाण्यापूर्वी मोदींनी अमर जवान ज्योतीवर जाऊन वीरांना मानवंदना वाहिली. यावर्षीच्या संचलनाची मुख्य संकल्पना होती महिला सबलीकरण...महिला पथकांचं संचलन आणि महिला अधिकार्‍यांनी इतर पथकांचं केलेलं नेतृत्त्व हे आजच्या परेडचं आकर्षण होतं. प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये फक्त महिला असलेली पथकं यावेळी पहिल्यांदाच सहभागी झाली होती. यावेळी नाईक नीरज कुमार सिंग आणि मेजर मुकुंद वरदराजन यांचा मरणोत्तर अशोक चक्र देऊन सन्मान करण्यात आला.

लष्करी सामर्थ्याचं दर्शन

राजपथावर भारतीय संस्कृतीचं दर्शन घडलंच पण भारतीय तिन्ही सैन्य दलाच्या सामर्थ्याचा दबदबा पाहण्यास मिळाला. आज सैन्य दलाच्या परेड अगोदर भारतीय लष्कराच्या मिसाईल आणि रणगाड्यांच्या सामर्थ्याचं दर्शन घडलं. तसंच बाईक स्वारांनीही खास चित्तथरारक प्रात्यक्षिकं सादर केली. विशेष म्हणजे सर्वात शक्तीशाली समजल्या जाणार्‍या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा या सोहळ्याला उपस्थित होते. त्यामुळे भारतीय आरमाराने पूर्ण ताकदीने प्रात्यक्षिक सादर करून 'हम इंडियावाले' दाखवून दिलं.

भारतीय संस्कृतीची परंपरा

बराक ओबामा आणि त्यांच्या पत्नी मिशेल ओबामा सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे लाभल्यामुळे हा सोहळा ऐतिहासिक असाच ठरला. विविधतेनं नटलेल्या भारतीय संस्कृतीचा साज राजपथावर अवतारला. काश्मीर ते कन्याकुमारी अखंड भारताच्या संस्कृतीनी नटलेले चित्ररथ मोठ्या दिमाखात सादर झाले. खास म्हणजे, यंदाचा महाराष्ट्राचा चित्ररथ..टाळ, मृदंगाचा नाद, विठ्ठल नामाच्या गजरात चित्ररथ सादर झाला. त्यामुळे जणू राजपथावर 'पंढरी'च अवतरली होती. महाराष्ट्राचा मानबिंदू असणार्‍या पंढरीच्या वारीचं दर्शन आज महाराष्ट्राच्या चित्ररथातून घडलं. तसंच राजपथावर पंढरीच्या रिंगणासोबतच अस्सल मराठमोळा गोंधळही रंगला.

 मानानं फडकला मराठी झेंडा

राजपथावरील प्रजासत्ताक दिनाच्या संचलन सोहळ्यात मराठी झेंडाही अगदी मानानं फडकला. महाराष्ट्राच्या दोन युवा तरुणांनी आज संचलन सोहळ्यात आपापल्या तुकड्यांचं नेतृत्व केलं. 160 विद्यार्थ्यांचा समावेश असलेल्या एनएनएसचे नेतृत्व मुंबईतील आर. झेड. शहा कॉलेजची विद्यार्थिनी खुशबू जोशीनं केलं. तर 144 कॅडेट असलेल्या एनसीसीचे नेतृत्व करण्याची संधी अहमदनगरच्या अमन जगताप याला मिळाली.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 26, 2015 02:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close