S M L

सुरक्षा परिषदेत भारताच्या कायम सदस्यत्वासाठी अमेरिकेचा पाठिंबा - ओबामा

Samruddha Bhambure | Updated On: Jan 27, 2015 05:00 PM IST

सुरक्षा परिषदेत भारताच्या कायम सदस्यत्वासाठी अमेरिकेचा पाठिंबा - ओबामा

27 जानेवारी : भारताला संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचे कायमस्वरुपी सदस्यत्व मिळावे, यासाठी आपण आग्रही आहोत, असं अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी मंगळवारी स्पष्ट केले. भारतातील पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी प्रकल्पासाठीही मदत करण्यास अमेरिका तयार असल्याचे ओबामा  यांनी सांगितले.

गेल्या दोन दिवसांपासून भारत भेटीवर असलेल्या ओबामा यांनी मंगळवारी सकाळी दिल्लीतील सिरी फोर्ट सभागृहात विविध क्षेत्रांतील निवडक मान्यवर आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सुमारे 30 मिनिटे अत्यंत उत्स्फूर्तपणे केलेल्या भाषणात ओबामा यांनी दोन्ही देशांतील संबंध, मानवाधिकार, स्वातंत्र्य, महिलांची प्रगती यासह विविध विषयांवर आपले विचार मांडले. यावेळी ओबामांची पत्नी मिशेल या सुद्धा सभागृहात उपस्थित होत्या. नोबेल पुरस्कार विजेते कैलास सत्यार्थीही यावेळी उपस्थित होते. ओबामांनी आपल्या भाषणात त्यांचा उल्लेखही केला.

आपल्या भाषणामध्ये हिंदी चित्रपटातील एक डायलॉग म्हणत प्रेक्षकांची वाहवा मिळवली. अत्यंत उत्स्फूर्तपणे केलेल्या भाषणाच्या सुरुवातीलाच ओबामा यांनी सर्वांना 'नमस्ते' केला. गेल्यावेळी भारत भेटीवर आलो, त्यावेळी इथल्या काही कार्यक्रमांमध्ये मी आणि मिशेल यांनी नाचण्याचाही आनंद घेतला होता, अशी आठवण सांगून ओबामा म्हणाले, यावेळी तशी संधी मिळाली नाही. सॅनोरिटा, बडे बडे देशों में... मला काय म्हणायचे आहे, ते तुम्हाला कळले असेलच, असे त्यांनी म्हणताच उपस्थितांनी टाळ्या वाजवून त्यांना दाद दिली.

गेल्या भारत भेटीवेळी मुंबईमध्ये दिवाळीच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्याची आठवण सांगून त्यानंतर व्हाईट हाऊसवमध्ये दिवाळी साजरी केल्याचे ओबामा यांनी सांगितले. प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी बुलेटवरून केलेल्या चित्तथरारक कसरती आपल्याला विशेष आवडल्याचे ओबामा म्हणाले. त्याचवेळी बुलेटवरून फिरण्याची माझी इच्छा आहे. मात्र, आपली सुरक्षायंत्रणा त्याला परवानगी देणार नाही, असं म्हणून ओबामा मिष्किल हसले.

भारत आणि अमेरिका केवळ नैसर्गिक भागीदार नसून, सर्वोत्तम भागीदार असल्याचं म्हणत ओबामा यांनी या दोन्ही देशांनी एकत्रितपणे जगासाठी दिशादर्शक काम केले पाहिजे, अशी अपेक्षा मंगळवारी व्यक्त केली. कोणत्याही देशतील महिला यशस्वी झाल्या तरच तो देश यशस्वी होतो, यावरही ओबामा यांनी आपल्या भाषणात जोर दिला. महिलांना पुरुषांच्या बरोबरीने जगण्याचे स्वातंत्र्य मिळाले पाहिजे, असेही ते म्हणाले. जग अण्वस्त्रमुक्त असले पाहिजे, असे सांगत अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी भारत आणि अमेरिकेतील अणुकरारामुळे प्रदूषणमुक्त विजेची उपलब्धता वाढणार असल्याकडे लक्ष वेधले. देशातील गरिबांची स्वप्नेही इतर व्यक्तींइतकीच महत्त्वाची आहेत. त्यांना स्वप्ने बघण्याचा आणि ती साकारण्यासाठी प्रयत्न करण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. भारतामध्ये हे चित्र पाहायला मिळते. मी आणि मिशेल दोघेही अत्यंत गरीब कुटुंबातून आलो आहे. आम्ही शिक्षणाच्या साह्याने इथपर्यंत येऊन पोहोचलो आहोत. भारतात तरुणांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे ते स्वप्न बघू शकतात आणि ती साकारण्यासाठी प्रयत्नही करू शकतात, असं ही ते म्हणाले.

भारताला दोन व्यक्तींमुळे जगभरात वेगळी ओळख मिळाली आहे. ते म्हणजे महात्मा गांधी आणि स्वामी विवेकानंद. गांधीजी लोकांसाठी झगडत राहिले. मार्टिन ल्यूथर किंग यांनीही त्यांच्याकडून प्रेरणा घेतली होती. तर स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेत माझ्याच शिकागोमध्ये, माझ्या बंधु भगिनींनो म्हटले होते. आज मी भारतात म्हणू इच्छितो, माझ्या बंधू भगिनींनो... असं म्हटल्यावर प्रेक्षकांकडून टाळ्यांचा कडकडात झाला.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 27, 2015 01:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close