S M L

नेता नशीबवान हवा की कमनशीबी - मोदी

Samruddha Bhambure | Updated On: Feb 1, 2015 08:34 PM IST

नेता नशीबवान हवा की कमनशीबी - मोदी

narendra modi speech

01 फेब्रुवारी :   मी सत्तेवर आल्यापासून पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होत आहेत. यावरून माझ्यावर टीका करणारे म्हणतात की, मोदींचे नशीब चांगले आहे त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी होत आहेत. माझ्या नशिबामुळे जर जनतेचे पैसे वाचणार असतील तर कमनशिबींना मतदान करण्याची काय गरज? असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत भाजपलाच बहुमताने निवडून देण्याचे आवाहन केले आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदानापूर्वीचा आज शेवटचा रविवार असल्याने दिल्लीत सर्व पक्षांचे वरिष्ठ नेते आज प्रचारासाठी मैदानात उतरले होते. द्वारका येथे पंतप्रधान मोदी यांनी सभा घेतली. यावेळी बोलताना त्यांनी अरविंद केजरीवाल आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली. आप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या पडद्यामागे काही वेगळ्या हालचाली सुरू असल्याचा आरोप यावेळी पंतप्रधानांनी केला. त्याचप्रमाणे आंदोलन करणार्‍या सरकारला निवडून न देता काम करणार्‍या सरकारला निवडून देण्याचं आवाहनही त्यांनी दिल्लीकरांना केले आहे. दिल्लीला एका संवेदनशील सरकारची आवश्यकता आहे. दिल्लीने मला भरपूर काही दिलंय, दिल्लीकरांनी केलेले प्रेम मला व्याजासकट परत करायचे आहे, अशी भावनिक साद घालत त्यांनी मतदारांशी संवाद साधला. सरकार चालवणं हे जबाबदारीचं काम असून त्यातून पळ काढून चालत नाही, असा टोला त्यांनी केजरीवालांना लगावला आहे.

दिल्लीच्या जनतेने यंदा बहुमताचे सरकार स्थापन करावे, गेल्या निवडणुकीत त्रिशंकू स्थितीमुळे दिल्लीचे एक वर्ष निकामी गेले. यामध्ये दिल्ली पंचवीस वर्षांनी मागे पडली. दिल्लीला पुढे न्यायचं आहे, त्यासाठी भाजपचे बहुमताचे सरकार सत्तेवर आणा असे आवाहन त्यांनी केले. मोदींनी दिल्लीतील झोपडपट्ट्यात राहणार्‍यांना मजबूत घर, पाणी, वीज आणि शिक्षण अशा मूलभूत गरजा पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. 'माझ्या परदेशी धोरणांवर अनेक वेळा टीका झाली आहे. मात्र मला चांगल्या प्रकारे माहिती आहे की, भारताला कशा प्रकारे जगासमोर ठेवायचे? कारण मी आपल्या देशाला चांगले ओळखून आहे.' मी विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढली आणि मी सरकारसुद्धा याच मुद्द्यावर चालवत आहे. सर्वच समस्यांवर विकास हाच एक उपाय आहे, असेही ते म्हणाले.

मोदींच्या सभेपूर्वी बदरपूर येथे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी देखील प्रचारसभा घेतली. एका पक्षात प्रचारक आहेत तर दुसर्‍या पक्षात धरणेबाज आहेत, असा टोला लगावत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान मोदी आणि अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे. काँग्रेसचा विरोध करून सत्ता स्थापन करणे हेच आप व भाजपचे उद्दिष्ट असल्याचे सोनिया गांधी यांनी म्हटले आहे.

गेल्या निवडणुकीत दिल्लीतील जनतेसाठी चांगले सरकार यावे म्हणून आम्ही 'आप'ला पाठिंबा दिला. पण केजरीवाल यांना दीड महिनादेखील सरकार चालवता आले नाही व ते जबाबदारी सोडून पळून गेले, असे सोनिया गांधी यांनी निदर्शनास आणून दिले. भाजपनेही दिल्लीतील जनतेला वार्‍यावर सोडले होते. त्यामुळे दिल्लीकरांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. महिलांवरील अत्याचारात वाढ झाली, महागाई व भ्रष्टाचारही फोफावला असा आरोपही त्यांनी केला. काळा पैसा परत आणून प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये, तरुणांना रोजगार अशी आश्वासनं मोदी सरकारने दिली होती, त्या आश्वासनांचे काय झाले, असा सवालही त्यांनी नरेंद्र मोदींना विचारला.

तर दुसरीकडे अरविंद केजरीवालांनी आज एका रॅलीत 49 दिवसांमध्ये राजीनामा दिल्याबद्दल जनतेची माफी मागितली. यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या काळात बलात्काराच्या घटनांमध्ये 30 टक्क्यांनी वाढ झाल्याचा आरोपही केला.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 1, 2015 06:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close