S M L

दिल्लीत 'आप'ची त्सुनामी, भाजप भुईसपाट

Sachin Salve | Updated On: Feb 10, 2015 10:54 PM IST

दिल्लीत 'आप'ची त्सुनामी, भाजप भुईसपाट

10 फेब्रुवारी : दिल्ली पुन्हा एकदा 'आम आदमी'ची झालीये. भारतीय निवडणुकीच्या इतिहासात अभूतपूर्व असा विजयरथ अरविंद केजरीवाल यांच्या पार्टीने खेचून आणलाय. 'आप'च्या त्सुनामीत मोदी लाट आणि काँग्रेसचा सुपडा साफ झालाय. 'आप'ने एकहाती सत्ता राखत 70 जागांपैकी 67 जागापटकावल्या आहेत. आता दिल्लीत आम आदमीचं सरकार स्थापन होणार यात तिळमात्र शंका उरलेली नाही. या ऐतिहासिक विजयामुळे देशभरात आपच्या कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आलंय. येत्या 14 तारखेला केजरीवाल शपथ घेण्याची शक्यता आहे.

दिल्लीचं तख्त कोण राखणार ?, असा सवाल उपस्थित झाला खरा पण तर दिल्लीकरांनी 'आप'च्या झोळीत आपली मत टाकून दिल्लीच्या तख्तावर पुन्हा विराजमान होण्याचा बहुमान दिलाय. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या 70 जागांसाठी आज सकाळी 8 वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली. मतमोजणीच्या सुरुवातीपासून 'आप'ने आघाडी घेतली. आपने घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम राखली. आपची आघाडी ही आता विजयात रुपांतरीत झालीये. 'आप'ने बहुमतासाठी लागणार्‍या 36 जागांचा जादूई आकडा मोडीत काढून खणखणीत 67 जागांवर कब्जा केलाय.

दिल्लीच्या निवडणुकीत आतापर्यंत कोणत्याही पक्षाने इतक्या मोठ्या संख्येनं बहुमत मिळवलं नाही असा करीश्मा 'आप'ने करून दाखवलाय. आपचे सर्वच उमेदवार मोठ्या फरकाने आघाडीवर आहे तर अनेकांनी विजयाकडे झेप घेतलीये. तर दुसरीकडे मोदी लाटेवर स्वार झालेल्या भाजपला दिल्लीत आपने सातवे आसमान दाखवले आहे. भाजपला दुहेरी आकडाही गाठता आला नाही. भाजपला बड्या मुश्किलीने 3 जागांवर आघाडी मिळाली आहे. भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमदेवार किरण बेदीही पराभूत झाल्या आहेत. किरण बेदी यांनी पराभव स्वीकारला असून केजरीवाल यांचं अभिनंदन केलंय. तर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केजरीवाल यांना फोन करून अभिनंदन केलंय. मोदींनी केजरीवाल यांना 'चाय पे चर्चे'चं निमंत्रण दिलंय. तर काँग्रेसचा आजपर्यंतचा सर्वात मोठा लाजिरवाणा पराभव झालाय. काँग्रेसला साधा भोपळाही फोडता आला नाहीये. अजय माकन यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारून सरचिटणीसपदाचा राजीनामा दिलाय. आता या अभूतपूर्व विजयामुळे दिल्ली फक्त आपच्या कार्यकर्त्यांचा जल्लोषाने न्हाऊन निघालीये. ठिकठिकाणी आपचे कार्यकर्ते एकमेकांना पेढे भरून आनंदोत्सव साजरा करत आहे. तर कुठे कार्यकर्ते मनसोक्त नाचून आनंद साजरा करत आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 10, 2015 06:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close