S M L

मोदी सरकारविरोधात अण्णा मैदानात

Sachin Salve | Updated On: Feb 23, 2015 07:23 PM IST

मोदी सरकारविरोधात अण्णा मैदानात

नवी दिल्ली (23 फेब्रुवारी) : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारलाय. मोदी सरकार विरोधात अण्णा पहिल्यांदाच मैदानात उतरले आहे. अण्णांच्या एक दिवसाचं लाक्षणिक उपोषणाला दिल्लीत जंतरमंतर मैदानावर सुरुवात झालीये. नेहमीच्या आंदोलनाप्रमाणे देशभरातून अण्णा समर्थक जंतरमंतरवर एकवटले आहे.

एकीकडे मोदी सरकारचं संसदेच्या अर्थसंकल्पयी अधिवेशनाला सुरूवात झालीये. अधिवेशनात सरकारला घेरण्यासाठी विरोधकांनी रणनीती आखलीये. पण संसदेबाहेरही मोदी सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आजपासून दिल्लीच्या जंतरमंतरवर धरणं आंदोलन करतायत. हे आंदोलन उद्यापर्यंत चालणार आहे. मोदी सरकारने आणलेल्या भूसंपादन कायद्याच्या अध्यादेशाविरोधात हे आंदोलन आहे. हा अध्यादेश शेतकरीविरोधी आणि उद्योगपतींच्या बाजूचा आहे असा आरोप होत आहे. त्यामुळे अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा सरकारविरोधात एल्गार पुकारला आहे. त्यांच्यासोबत देशभरातल्या 22 शेतकरी संघटनाही आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. तसंच सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर याही आंदोलनता सहभागी झाल्या आहेत. देशभरातून 10 राज्यांतील जवळपास 5 हजार लोक या आंदोलनात सहभागी होतील असा आयोजकांचा अंदाज आहे. विशेष म्हणजे, याअगोदर अण्णांनी यूपीए सरकारविरोधात तीन आंदोलनं केली होती. तिन्ही आंदोलनला जनतेनं भरभरून पाठिंबा दिला होता. एवढंच नाहीतर पहिल्या आंदोलनात यूपीए सरकारला अक्षरश: अण्णांच्या आंदोलनापुढे नमतं घ्यावं लागलं होतं. त्यामुळे मोदी सरकार अण्णांच्या आंदोलनाची दखल कशी घेतं हे पाहण्याचं ठरणार आहे.

दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री आणि एकेकाळचे अण्णांचे जवळचे सहकारी अरविंद केजरीवाल आज अण्णांची भेट घेणार आहेत. संध्याकाळनंतर केजरीवाल जंतरमंतरवर जातील. दुसर्‍यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर दोघांची ही पहिलीच भेट असेल. त्यामुळे या भेटीत काय बोलणं होतं हे महत्वाचं ठरणार आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 23, 2015 02:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close