S M L

'आप'च्या कार्यकारिणीतून भूषण-यादवांची हकालपट्टी ?

Sachin Salve | Updated On: Mar 3, 2015 04:10 PM IST

'आप'च्या कार्यकारिणीतून भूषण-यादवांची हकालपट्टी ?

03 मार्च : दिल्लीच्या तख्तावर पुन्हा एकदा विराजमान झालेल्या आम आदमी पक्षात दुफळी माजलीये. आम आदमी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची उद्या बुधवारी दिल्लीत बैठक होतेय. या बैठकीत प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव या दोघांना राष्ट्रीय कार्यकारिणीतून काढून टाकलं जाण्याची शक्यता असल्याचं कळतंय.

'अहंकार बाळगू नका, संयमाने काम करा' असा सल्ला आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभा विजयानंतर कार्यकर्त्यांना दिला होता. पण, आपच्या भोवती वादाची किनार पुन्हा लागलीये. आपचे ज्येष्ठ नेते योगेंद्र यादव यांनी एका पत्रकाराशी केलेला संवाद रेकॉर्ड करण्यात आल्याची बातमी 'इंडियन एक्सप्रेस'या इंग्रजी दैनिकामध्ये देण्यात आली होती. योगेंद्र यादव यांनी पक्षातली गोपनीय माहिती मीडियाला दिल्याचं त्यात म्हटलंय.

तसंच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पक्षाच्या संयोजकपदावरून दूर करण्यासाठी या दोन नेत्यांनी कारवाया केल्याचा त्यांच्यावर आरोपही झाला. पक्षाचे नेते संजय सिंह यांनी पत्रकार परिषद घेऊन याबद्दल धक्कादायक खुलासा केला. तसंच प्रशांत भूषण यांचे वडील आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते शांती भूषण यांच्यावर अप्रत्यक्षपणे त्यांनी टीका केली होती. त्यामुळे वाद निर्माण झाला होता. खुद्ध केजरीवाल यांना यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. आता उद्या आपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होत आहे.

या बैठकीला प्रशांत भूषण उपस्थित राहणार नाहीत. आधीच ठरलेल्या कार्यक्रमामुळे आपण बैठकीला जाऊ शकणार नसल्याचं भूषण यांनी स्पष्ट केलंय. केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतांना अशा कार्यकर्त्यांची गय केली जाणार नाही असा इशारा दिला होता. त्यामुळे उद्या प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, योगेंद्र यादव हे पक्षाचे कार्यकर्तेच नाही तर ज्येष्ठ राजकीय विश्लेषकही आहे. पक्षाच्या जडणघडणीत त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे 'आप'च्या कार्यकारिणीत काय निर्णय घेतला जातो हे पाहण्याचं ठरणार आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 3, 2015 04:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close