S M L

मुफ्तींना विचारा ते भारतीय आहेत की नाही? - आरएसएस

Samruddha Bhambure | Updated On: Mar 8, 2015 03:52 PM IST

मुफ्तींना विचारा ते भारतीय आहेत की नाही? - आरएसएस

08 मार्च : जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहंमद सईद हे भारतीय आहेत की नाहीत, असा प्रश्न भाजपने त्यांना विचारायला हवा, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) आपल्या मुखपत्रातून मांडले आहे. आरएसएसच्या 'ऑर्गनायझर' या मुखपत्रातून सीबीआयचे माजी संचालक जोगिंदर सिंह यांनी सईद यांच्या दुटप्पी भूमिकेवर टीकास्त्र सोडले आहे.

जम्मू काश्मीरमध्ये भाजपने मुफ्ती सईद यांच्या पीडीपीबरोबर नुकतीच सत्ता स्थापन केली आहे. या युतीनंतर आता भाजप आणि पीडीपीमध्ये मतभेद होताना दिसत आहेत. कट्टर फुटीरतावादी नेता मसरत आलमवर देशाविरोधात युद्ध पुकारणे, दहशतवादी कारवाया करणे आदी गंभीर गुन्हे दाखल आहेत. अशा या दहशतवाद्याला तुरुंगातून मुक्त करण्याचे आदेश काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती यांनी दिले.

जोगिंदर सिंह यांनी या लेखात लिहिले आहे, की मुफ्ती यांनी दुहेरी भूमिका घेऊ नये. शिकारी कुत्रा आणि ससा एकत्र चालू शकत नाहीत, असे म्हणत 'मुफ्ती हे खरोखरच भारतीय आहेत का? असे भाजपने त्यांना ठणकावून विचारावे,' असेही सिंह यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून मुफ्ती सतत वादाच्या भोवर्‍यात आहेत. पहिल्याच दिवशी त्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या शांततापूर्ण निवडणुकीचे श्रेय पाकिस्तान, फुटीरतावादी आणि अतिरेक्यांना दिले होते. त्यावरून टीका होत असतानाच अतिरेकी अफझल गुरूच्या मृतदेहाचे अवशेष कुटुंबीयांना देण्याची मागणी केली. इतकेच नव्हे, तर देशाविरोधात युद्ध पुकारल्याच्या आरोपासह डझनभर गुन्हे असलेल्या मसरत आलमला शनिवारी तुरुंगातून सोडले. त्यामुळे पीडीपी आणि भाजपने थाटलेल्या नव्या संसारात आता फूट पडताना दिसत आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 8, 2015 03:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close