S M L

केरळ विधानसभेत रणकंदन, अर्थमंत्र्यांना धक्काबुक्की

Samruddha Bhambure | Updated On: Mar 13, 2015 05:30 PM IST

केरळ विधानसभेत रणकंदन, अर्थमंत्र्यांना धक्काबुक्की

13 मार्च : देशातलं सर्वात सुशिक्षित राज्य म्हणून प्रसिद्ध असणार्‍या केरळमध्ये आज लोकशाहीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. अर्थसंकल्प सादरीकरणादरम्यान मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या आमदारांनी अर्थमंत्री के. एम. मणी यांना धक्काबुक्की केली.

अर्थमंत्री मणी यांच्यावर लाच घेतल्याचा आरोप असून त्यांना सभागृहात प्रवेश करू देणार नाही असा इशारा विरोधकांनी दिला होता.हा विरोध पाहून मणी यांच्यासह 70 हून अधिक आमदारांनी काल रात्रीपासून सभागृहातच मुक्काम केला. या सर्व गोंधळातच आज सकाळी 9 वाजता अर्थमंत्री आमदारांच्या सुरक्षा कवचात अर्थसंकल्प सादर करण्यास उभे राहिल्यावर विरोधकांनी जोरदार निदर्शनं करत सभागृहात गोंधळ माजवला, एवढंच नाही तर विधानसभा अध्यक्षांची खुर्चीसुद्धा उखडून फेकून दिली आणि मणी यांना धक्काबुक्कीही केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमारही करावा लागला. या सर्व गोंधळातच मणी यांनी त्यांचे भाषण कसेबसे पूर्ण केले.

केरळमध्ये बारचे परवाने देण्यासाठी के. एम. मणी यांनी एक कोटी रुपयांची लाच घेतल्याचा विरोधीपक्षाचा आरोप आहे. केरळात छोट्या आणि मध्यम हॉटेल्समध्ये तसच वाईन शॉपमध्ये दारू विक्रीवर बंदी आहे. केरळमध्ये फक्त थ्री, फोर आणि फाईव्ह स्टार हॉटेल्समध्ये दारू विक्री करता येते. त्यामुळे या हॉटेल्सच्या परवान्यांचं नुतनीकरण करण्यासाठी अर्थमंत्र्यांनी लाच घेतल्याचा डाव्यांचा आरोप आहे.

केरळचे 91 वर्षांचे विरोधीपक्ष नेते व्ही.एस. अच्युतानंदन यांच्या नेतृत्वात गेला आठवडाभर विधासभेत गोंधळ सुरू आहे. दरम्यान, विधानसभेबाहेरही भाजपनं जोरदार निदर्शनं सुरू केली आहे. त्यांना पांगवण्यासाठी पुन्हा पोलिसांना लाठीमार करावा लागला आहे. या सगळ्या प्रकारात एका आमदाराला भोवळ आली तर एकाचा हृदयविकाराच्या धक्क्यानं मृत्यू झाला.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 13, 2015 01:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close