S M L

संतसाहित्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यात सरकार कमी पडलं - मुख्यमंत्री

Samruddha Bhambure | Updated On: Apr 5, 2015 08:58 PM IST

संतसाहित्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यात सरकार कमी पडलं - मुख्यमंत्री

Fadnavis

05 एप्रिल : संतसाहित्य जीवनाशी निगडीत असतं आणि हेच साहित्य राज्यातील शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यात सरकार कमी पडलं आहे, अशी कबुली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (रविवारी) घुमानमध्ये यांनी दिली आहे. सध्याच्या नैराश्याच्या काळात संतसाहित्य या शेतकर्‍यांपर्यंत पोहोचलं तर नक्कीच त्यांना उभारी मिळेल, आणि शेतकर्‍यांच्या आत्महत्या कमी होतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

घुमान इथे सुरू असलेल्या साहित्य संमेलनाची आज (रविवारी) सांगता झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वे मंत्री सुरेश प्रभू, राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. अनुदानानासाठी सरकारच्या दारापर्यंत यायची तुम्हाला गरज नाही, पुढच्या वर्षीपासून दरवर्षी दसर्‍यापूर्वी संमेलनासाठीचा निधी साहित्य महामंडळाच्या आणि नाट्यपरिषदेच्या खात्यात जमा होईल, असं आश्वासन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी यावेळी दिलं. तसंच राज्यात 'पुस्तकांचा गाव' करण्यासाठी आपलं सरकार कटिबद्ध असल्याचंही ते म्हणाले. तर, 'इतिहास वाचल्याशिवाय आधुनिकतेशी जोडता येत नाही', असं म्हणत संमेलनाध्यक्ष डॉ.सदानंद मोरे यांनी आपल्यावरच्या आरोपांना उत्तर दिलं. उद्घाटनाच्या भाषणात फक्त इतिहासातच रमल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता.

साहित्य नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी मराठी भाषेला आधुनिकतेशी जोडावे लागेल असेही फडणवीस यांनी सांगितले. सध्या महाराष्ट्रात 150 हून अधिक प्रकारची साहित्य संमेलन होतात. आता राजकारण्यांचे साहित्य संमेलन होऊ नये आणि साहित्य संमेलनाचंही राजकारण होऊ नये असं मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले.

तसंच, पंजाब सरकारने मराठी साहित्य संमेलनासाठी सहकार्य केलं यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंजाब सरकारचे आभार मानले. तसंच पुढील वर्षीचं पंजाबी साहित्य संमेलन महाराष्ट्रात भरवावे अशी विनंतीही त्यांनी पंजाब सरकारला केली आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 5, 2015 08:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close