S M L

सत्यम घोटाळ्याप्रकरणी सर्व दोषींना 7 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

Samruddha Bhambure | Updated On: Apr 9, 2015 05:30 PM IST

सत्यम घोटाळ्याप्रकरणी सर्व दोषींना 7 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

09 एप्रिल : देशातील सर्वात मोठा कॉर्पोरेट घोटाळा ठरलेल्या 'सत्यम कॉम्प्युटर्स'प्रकरणी हैदराबादमधील विशेष कोर्टाने आज (गुरुवारी) बी. रामलिंग राजू याच्यासह सर्व 10 आरोपींना दोषी ठरवत कोर्टाने त्यांना 7 वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. त्याचबरोबर रामलिंग राजू आणि त्याचा भाऊ रामा राजू यांना प्रत्येकी 5 कोटी रुपये दंडही ठोठावण्यात आला आहे.

सिक्युरिटी अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात सेबीने गेल्यावर्षी या प्रकरणाचा तपास पूर्ण करून त्यांचा निकाल जाहीर केला होता. आपल्या 65 पानी आदेशात सेबीने 'सत्यम कॉम्प्युटर्स'चा संस्थापक रामलिंग राजू याच्यासह 5 जणांना दोषी ठरवले. या प्रकरणी रामलिंगम राजूचा भाऊ रामा राजूला ही दोषी ठरवण्यात आलं आहे. हा खटला तब्बल 6 वर्षं सुरू होता. या खटल्यात आतापर्यंत 200हून अधिक साक्षीदारांची साक्ष झालीय तर 3 हजारांहून अधिक कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. कॉर्पोरेटमधील या सर्वात मोठ्या घोटाळ्याचा उलगडा 2009मध्ये झाला होता. या घोटाळ्यात समभागधारकांचे जवळपास 14 हजार कोटींचं नुकसान झालेलं आहे.

काय आहे 'सत्यम' घोटाळा?

 • 2003-2008 : कंपनीचा मोठेपणा दाखवण्यासाठी बनावट क्लायंट, बनावट प्रकल्प आणि बनावट कागदपत्रं बनवली
 • 2009 : 5 हजार 200 कोटींची खोटी विक्री दाखवली, खरी विक्री 4 हजार 100 कोटी रू.
 • 2009 : खरा नफा 3% असताना 24% नफा दाखवला
 • झालेलं नुकसान 7 हजार 900 कोटी रू.

सत्यम' घोटाळा घटनाक्रम

 • 7 जाने. 2009 : सत्यमचे संस्थापक रामलिंगम राजूंचा राजीनामा
 • 8 जाने. 2009 : सिटी बँकेनं सत्यमची 30 खाती गोठवली
 • 9 जाने. 2009 : रामलिंगम राजू आणि बी रामा राजू यांना अटक
 • 9 जाने. 2009 : केंद्र सरकारनं सत्यमचं संचालक मंडळ बरखास्त केलं
 • फेब्रुवारी 2009 : सीबीआयनं तपास हाती घेतला, 3 आरोपपत्र दाखल
 • जून 2009 : महिंद्रानं सत्यमचा ताबा घेऊन महिंद्रा सत्यम असं नाव दिलं
 • 2010 : रामलिंगम राजूंनी जबाब फिरवला, सीबीआयचे आरोप खोटं असल्याचं सांगितलं
 • 9 एप्रिल 2015 : स्पेशल कोर्टानं 10 जणांना दोषी ठरवलं

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 9, 2015 12:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close