S M L

शेतकर्‍यांमध्ये भीतीच वातावरण - राहुल गांधी

Samruddha Bhambure | Updated On: Apr 19, 2015 03:12 PM IST

 शेतकर्‍यांमध्ये भीतीच वातावरण - राहुल गांधी

BRKING940_201504191234_940x355

19 एप्रिल : मोदी सरकार देशाचा पाया असलेल्या शेतकर्‍यांना कमकूवत करत असून लोकसभा निवडणुकीत उद्योजकांकडून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी भूसंपादन विधेयक आणलं जात असल्याचा घणाघात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. मोदींच्या धोरणामुळे शेतकरी आणि कामगार वर्गात भीतीच वातावरण निर्माण झालं असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

रामलीला मैदानावर आयोजित किसान-खेत-मजदूर रॅलीत शेतकर्‍यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यूपीएच्या काळातील भूसंपादन कायद्यात उद्योगधार्जिणे बदल करून उद्योगपतींच्या मर्जीतील कायदा शेतकर्‍यांचा माथी मारण्याचा मोदी सरकारचा डाव आहे. मोदींनी गुजरात मॉडेलच्या नावाखाली लोकसभा निवडणुका लढण्यासाठी उद्योगपतींकडून हजारो कोटींचं कर्ज घेतलं. आता या भरमसाट कर्जाची परतफेड करण्याची भाजपवर वेळ आली आहे आणि त्यासाठीच हे भूसंपादन दुरुस्ती विधेक रेटण्यात येत आहे, असा घणाघाती हल्ला राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर केला.

पंतप्रधान मोदींना ही जमीन लँडबँक म्हणून वापरायची आहे. अशा प्रकारचं विधेयक आणून कसं काय 'मेक इन इंडिया' होईल, असा प्रश्न काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी उपस्थित केला. काँग्रेस सरकारने आणलेल्या भूसंपादन विधेयकात बदल करून मोदी सरकारने त्यात उद्योगपतींच्या हिताच्या तरतुदींचा समावेश केला. त्यामुळे हे सरकार शेतकरी, कामगारांच्या हिताचे नसून, ते फक्त उद्योगपतींच्याच हिताचं असल्याचा आरोप करत याला येत्या काळात काँग्रेस याला सडेतोड उत्तर देईल, असा एल्गार राहुल गांधी यांनी पुकारला.

मोदींनी शेतकर्‍यांना केवळ स्वप्न दाखवली, पण प्रत्यक्षात काहीच केले नाही. 80 टक्के शेतकर्‍यांच्या संमतीशिवाय जमीन घेतली जाणार नाही, असं काँग्रेसच्या विधेयकात होतं, पण भाजपने ते बदललं. काँग्रेस पक्ष तुमच्यासोबत आहे, मी तुमच्यासोबत आहे, असे आश्वासन यावेळी राहुल गांधींनी उपस्थित शेतकर्‍यांना दिलं आहे. देशाला विकास हवा आहे, उद्योग हवे आहेत, मेक इन इंडिया हवं आहे. त्यासोबतच शेतकरीसुद्धा हवा आहे, असं राहुल गांधी यांनी म्हटले. शेतकर्‍यांना देशोधडीला लावणार्‍या भूसंपादन विधेयकाला विरोध करण्यासाठी शेतकरी एकटा नाहीये. त्यांच्यासोबत काँग्रेस कडाडून विरोध करेल, असं आश्वासन गांधी यांनी शेतकर्‍यांना दिलं.


Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 19, 2015 01:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close