S M L

मोदींची 'टाइम'ला मुलाखत,'चीनप्रमाणे भारतात हुकुमशाही नको'

Sachin Salve | Updated On: May 7, 2015 06:03 PM IST

मोदींची 'टाइम'ला मुलाखत,'चीनप्रमाणे भारतात हुकुमशाही नको'

07 मे : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुढच्या आठवड्यात चीनच्या दौर्‍यावर जात आहेत. या दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी 'टाइम' या आंतरराष्ट्रीय मासिकाला मुलाखत दिली. भारत आणि चीन हे नैसर्गिक मित्र आहेत असं म्हटलंय. या मुलाखतीमध्ये बोलताना मोदींनी भारताच्या लोकशाहीविषयी विश्वास व्यक्त केला. चीनप्रमाणे भारतामध्ये हुकुमशाहीची गरज नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.

पंतप्रधान मोदी मुलाखतीत म्हणतात, "भारत लोकशाही देश आहे, ती आमच्या डीएनएमध्ये आहे. वेगवेगळ्या राजकीय पक्षांचा विचार करायचा झाला तर, मला ठामपणे असे वाटते की, त्यांच्यामध्ये देश हिताचे निर्णय घेण्याइतपत परिपक्वता आणि शहाणपण आहे. त्यामुळे भारतात हुकुमशाहीची गरज आहे का असे तुम्ही मला विचारत असाल तर मी, सांगेन की नाही !, त्याची गरज नाही. भारतात सत्ता आपल्या हाती एकवटणार्‍या प्रभावशाली व्यक्तीची गरज आहे का, तर नाही, असे उत्तर असेल. तुम्ही मला लोकशाही मूल्ये आणि संपत्ती, सत्ता, समृद्धी आणि प्रसिद्धी यांच्यापैकी एकाची निवड करायला सांगितले तर मी अगदी सहजच लोकशाही मूल्यांची निवड करेन."

याच मुलाखतीत पंतप्रधान मोदींनी जातीय आणि धार्मिक एकतेविषयीही मतं व्यक्त केली. त्यांनी म्हटलंय की, "सरकारपुरता विचार करायचा झालं तर फक्त एकच पवित्र ग्रंथ आहे, ते म्हणजे देशाची राज्यघटना. देशाचं ऐक्य आणि अखंडता याला आमचे सर्वात जास्त प्राधान्य आहे. सर्व धर्म आणि सर्व समाजांना सारखेच हक्क आहेत, आणि त्यांना संपूर्ण सुरक्षा पुरवणे ही माझी जबाबदारी आहे. जात, पंथ आणि धर्माच्या आधारावर कोणत्याही प्रकारचा भेदभाव माझे सरकार सहन करणार नाही किंवा स्वीकारणार नाही."

 

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 7, 2015 06:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close