S M L

पंतप्रधानांच्या हस्ते स्मार्ट सिटीसह अन्य दोन योजनांचा शुभारंभ

Samruddha Bhambure | Updated On: Jun 25, 2015 03:37 PM IST

पंतप्रधानांच्या हस्ते स्मार्ट सिटीसह अन्य दोन योजनांचा शुभारंभ

25 जून : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वांकाक्षी स्मार्ट सिटी योजनेचा आज शुभारंभ करण्यात आला. देशभरातील 100 स्मार्ट सिटीज, अटल मिशन फॉर रिज्युन्हेवेशन ऍन्ड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन (अमृत) आणि प्रधानमंत्री आवास योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या अंमलबजावणीबाबतची घोषणा आज नरेंद्र मोदींनी केली. यामध्ये देशातील महत्त्वाच्या 100 शहरांची स्मार्ट सिटी योजना, 500 शहरांसाठी शहर सुधारणा आणि पुर्ननिर्माणासाठी अटल मिशन आणि पंतप्रधान आवास या योजनांचा समावेश आहे.

केंद्रशासित प्रदेश, राज्य, आणि शहरातील विविध तज्ज्ञांची मते जाणून घेत या योजना तयार करण्यात आल्या आहेत. केंद्र शासनाच्यावतीने या योजनांसाठी 4 लाख कोटी रूपयांच्या अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे.

स्मार्ट सिटी योजनेंतर्गत पाच वर्षांमध्ये भारतातील 100 शहरांचे स्मार्ट सिटीत रूपांतर करण्यात येणार आहे. त्यासाठी 48 हजार कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक 13 स्मार्ट सिटींची उभारणी करण्यात येणार आहे. शहरी विकास आणि पुर्ननिर्माण अटल मिशन योजनेत 500 शहरांचा कायापालट केला जाणार आहे. योजनेंतर्गत 5 वर्षांसाठी 50 हजार कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. पंतप्रधान आवास या योजनेत 2022 सालापर्यंत देशातील प्रत्येक नागरिकाला घर उपलब्ध करून देण्याचे वचन देण्यात आले आहे. येत्या 7 वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्यात येणार असून, यासाठी 3 लाख कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. प्रत्येक शहराला नियोजनबध्द विकासासाठी दरवर्षी शंभर कोटी रुपये मिळणार आहेत. पाच वर्षांसाठी हा निधी मिळत राहील. याचाच अर्थ पुढील पाच वर्षांसाठी या शहरांना पाचशे कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारकडून मिळेल.

दरम्यान, यावेळी पंतप्रधानांनी चाळीस वर्षांपूर्वी तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात जाहीर केलेल्या आणीबाणीचाही उल्लेख केला. त्यांच्या निर्णयावर टीका करत मोदी म्हणाले, फक्त सत्तेसाठी त्यावेळी देशात आणीबाणी जाहीर करण्यात आली होती. आणीबाणीमुळे संपूर्ण देशाचा तुरुंग बनला होता. आज 40 वर्षांनंतर प्रत्येक नागरिकाच्या विकासाच्या दृष्टीने काम करण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला आहे, असं मोदी म्हणाले. आणीबाणीच्यावेळी मानवी हक्कांसाठी लढणार्‍या जयप्रकाश नारायण यांच्या स्मृतीनिमित्त स्मारक उभारण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे, असंही त्यांनी सांगितलं.

कशी असेल स्मार्ट सिटी

- गृहप्रकल्पात समाजातल्या सर्व घटकांचा विचार केला जाईल

- जमिनींवरून वाद न करता जागांचा सहकारी तत्वांवर विकास

- ट्रॅफिक आणि प्रदुषणाच्या प्रश्नावर तोडगा म्हणून छोट्या टाऊनशिप

- शहरात सायकल आणि प्रदुषणमुक्त वाहनांवर भर

- पुरेशी मोकळी जागा आणि मैदानं, निसर्गाचं संरक्षण

- ई-गव्हर्नन्सचा वापर होणार

- कला, संस्कृती, संगीत, शिक्षणाला प्रोत्साहन

- सर्व अत्याधुनिक पायाभूत सुविधांची निर्मिती करणार

- नवीन विमानतळ, मेट्रो, रेल्वे आणि ईको बसचा वापर

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 25, 2015 01:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close