S M L

व्यापम घोटाळ्यात 48वा बळी

Samruddha Bhambure | Updated On: Jul 6, 2015 12:41 PM IST

व्यापम घोटाळ्यात 48वा बळी

06 जुलै : मध्य प्रदेशमधील वादग्रस्त 'व्यापमं' घोटाळ्याशी संबंधित संशयास्पद मृत्यूंची संख्या वाढत जात आहे. या घोटाळ्याशी निगडीत 48 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तर गेल्या तिन दिवसांत तिघांच्या झालेल्या संशयास्पद मृत्यूने या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. शनिवारी एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराचा मृत्यू झाला असतानाच, जबलपूरच्या नेता सुभाषचंद्र बोस मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. अरुण शर्मा (64) यांचा मृतदेह काल (रविवारी) संशयास्पद स्थितीत नवी दिल्लीत आढळल्याने खळबळ उडाली आहे. तर आज (सोमवारी) एक महिला ट्रेनी कॉन्स्टेबलनं आत्महत्या करत स्वत:ला संपवलं आहे.

अनामिका कुशवाहा असं मृत महिलेचं नावं आहे. 2014 साली व्यापम परीक्षांच्याद्वारे तिची पोलीस दलात भर्ती झाली होती. मध्य प्रदेशच्या सागर जिल्ह्यात तिचा मृत्यू झाला. त्यामुळे व्यापम घोटाळ्याशी संबंधित या मृत्यूच्या सत्रामागे नेमकं दडलंय काय, असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

व्यापम घोटाळ्यासंदर्भात रिपोर्टिंग करणार्‍या शोधपत्रकार अक्षय सिंहचा संशयास्पद मृत्यू झाला होता. त्याला काही तास उलटतात तोच, जबलपूर मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. अरुण शर्मा यांचा मृतदेह सापडल्यामुळे खळबळ माजली आहे. या घोटाळ्यात ज्या विद्यार्थ्यांनी बेकायदेशीरपणे प्रवेश मिळवला, त्यांची यादी डॉ शर्मा बनवत होते, असं समजतं. पण त्यांचा मृत्यू नैसर्गिक होता, असा दावा दिल्ली पोलीस करत आहेत. दिल्लीतल्या शफदरजंग रुग्णालयात त्यांचं पोस्ट मॉर्टम होणार आहे.

या घोटाळ्यात संशयास्पद मृत्यू झालेले डॉ. शर्मा हे जबलपूर मेडिकल कॉलेजचे दुसरे डीन आहेत. गेल्या वर्षी या कॉलेजचे तत्कालीन डीन डी. के. साकाली यांचा भाजून मृत्यू झाला होता. तेही प्री मेडिकल टेस्टद्वारे कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेल्या उमेदवारांची चौकशी करत होते. शर्मा यांनी आत्महत्या केली, अशा चर्चाही भोपाळमध्ये रंगू लागली आहे. दरम्यान, व्यापम घोटाळ्याशी संबंध असलेल्या 40 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू आतापर्यंत झाला आहे.

एम्समध्ये व्हिसेरा चाचणी

पत्रकार अक्षय सिंग यांची बहीण पाक्षी सिंग यांनी अक्षयच्या व्हिसेराची चाचणी राज्याबाहेर करण्यात यावी, अशी मागणी केली होती. शिवराजसिंह चौहान यांनी ही मागणी मान्य केली असून, ही व्हिसेरा चाचणी दिल्लीतील एम्समध्ये केली जाईल, असं त्यांनी रविवारी जाहीर केलं.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 6, 2015 12:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close