S M L

कलाम यांच्या अंत्यदर्शनासाठी रीघ, गुरूवारी अंत्यसंस्कार

Sachin Salve | Updated On: Jul 29, 2015 09:25 AM IST

कलाम यांच्या अंत्यदर्शनासाठी रीघ, गुरूवारी अंत्यसंस्कार

news

28 जुलै : माजी राष्ट्रपती आणि विद्यार्थ्यांचे लाडके शिक्षक डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी जगाचा निरोप घेतला आणि सारा देश हळहळला. डॉ. कलाम यांचं पार्थिव आज (मंगळवारी) दुपारी विशेष विमानाने दिल्लीतल्या पालम विमानतळावर आणण्यात आलं. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर आणि लष्कराच्या तिन्ही दलांच्या प्रमुखांनी यावेळी कलाम यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून त्यांना श्रद्धांजली वाहिली. लष्करातर्फे यावेळी मानवंदनाही देण्यात आली.

मंगळवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास तिरंग्यात गुंडाळलेले कलाम यांचं पार्थिव लष्करी अधिकार्‍यांनी विमानातून बाहेर आणले. त्यानंतर सेनादलाने त्यांना मानवंदना दिली. यावेळी सर्व प्रोटोकॉल बाजूला सारत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी पालम विमानतळावर जाऊन त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. त्यानंतर डॉ. कलाम यांचे पार्थिव दिल्लीतल्या 10, राजाजी मार्गावर असलेल्या शासकीय निवासस्थानी नेण्यात आले. तिथे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अन्य मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली. यावेळी भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनीही कलामांचे अंत्यदर्शन घेतले. तसंच कलाम यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी सर्व सामान्यांनीही मोठी रीघ लावली आहे. यात शाळकरी मुलं, महाविद्यालयीन विद्यार्थीही मोठ्या प्रमाणात आहेत.

डॉ. कलाम यांच्या पार्थिवावर गुरुवारी सकाळी दहा वाजता तामिळनाडूतील रामेश्वरम इथल्या त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

संसदेत माजी राष्ट्रपतींना वाहिली श्रद्धांजली...

संसदेच्या दोन्ही सभागृहातही आज डॉ. कलाम यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी कलाम यांच्या कार्याला उजाळा देत त्यांना आदरांजली वाहिली तर राज्यसभेत उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी कलाम यांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

सोमवारी संध्याकाळी 8.45 वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचं निधन झालं. ते 84 वर्षांचे होते. शिलाँगमधल्या 'आयआयएम'मध्ये डॉ. कलाम यांचे व्याख्यान सुरू असताना ते जागीच कोसळले. साधारण सातच्या सुमारास त्यांना बेथनी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. मात्र, हॉस्पिटलमध्ये जाण्याआधीच त्यांची प्राणज्योत मावळली. विद्यार्थ्यांमध्ये रमणारे अब्दुल कलाम शेवटच्या क्षणीही विद्यार्थ्यांसोबतच होते.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 28, 2015 02:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close