S M L

मोदी सरकारकडून लोकशाहीची हत्या - सोनिया गांधी

Samruddha Bhambure | Updated On: Aug 4, 2015 01:13 PM IST

 मोदी सरकारकडून लोकशाहीची हत्या - सोनिया गांधी

04 ऑगस्ट : काँग्रेस सदस्यांवरील निलंबनाच्या कारवाईवर आक्रमक झालेल्या काँग्रेसने आज संसदेबाहेर धरणं आंदोलन करून मोदी सरकावर सडकून टीकास्त्र सोडले. काँग्रेसच्या खासदारांचं निलंबन करून मोदी सरकारने लोकशाहीची हत्या केली आहे, असा घणाघाती आरोप काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केला.

संसदेतल्या गदारोळ प्रकरणी काँग्रेसच्या 25 खासदारांचं काल लोकसभा अध्यक्षांनी निलंबन केलं होतं. या कारवाईच्या निषेधार्थ काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आज संसद परिसरात धरणं आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यासह काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते तसंच राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष, राष्ट्रीय जनता दलाचे सदस्यही सहभागी झाले आहेत.

या वेळी सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. खासदारांचे निलंबन ही लोकशाहीविरोधी घटना असल्याचे सांगून, लोकशाहीची हत्या करण्यात आली असल्याची घणाघाती टीका सोनिया गांधी यांनी सरकारवर केली. संसद चालवणं ही सरकारची जबाबदारी असते, असंही त्या म्हणाल्या. तर भाजपच्या मंत्र्यांची वर्तणूक त्यांच्या पदाचा अवमान करणारी आहे, असं अरोप माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग केला आहे. लोकशाहीच्या परंपरेप्रमाणे त्यांनी वर्तणूक केलेली नाही. त्यामुळेच गेल्या दीड महिन्यांपासून आम्ही सातत्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहोत आणि त्या मागणीवर आम्ही ठाम असल्याचं मनमोहनसिंग यांनी म्हटलं आहे.

यावेळी राहुल गांधी यांनी सुद्धा सरकारवर कडाडून टीका केली. संसदेमध्ये जे घडले ते केवळ एक प्रतिक आहे. संपूर्ण देशात भाजप सरकारकडून अशी वागणूक इतरांना दिली जात आहे. विद्यार्थ्यांसोबत, शेतकर्‍यांसोबत, इंटरनेट वापरासंदर्भात सरकार हुकूमशाही पद्धतीने वागतं आहे. आमच्या सर्व खासदारांना संसदेतून निलंबित केलं, तरी आम्ही पूर्ण देशात सरकारला घेराव घालू, असा इशारा राहुल गांधींनी दिला आहे. लोकांना मन की बात सांगणार्‍यांनी देशातील लोकांचा आवाजही ऐकला पाहिजे, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला.

दरम्यान, खासदारांच्या निलंबनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या लोकसभेतील सदस्यांनी पुढील पाच दिवस कामकाजात सहभाग न घेण्याचे ठरवलं आहे. या काळात काँग्रेसकडून तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 4, 2015 01:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close