S M L

सुषमा स्वराजांचा काँग्रेसवर पलटवार, गांधी घराण्याला केलं लक्ष्य

Samruddha Bhambure | Updated On: Aug 12, 2015 09:15 PM IST

सुषमा स्वराजांचा काँग्रेसवर पलटवार, गांधी घराण्याला केलं लक्ष्य

12 ऑगस्ट : ललित मोदी प्रकरणात लोकसभेत काँग्रेसनं केलेल्या आरोपांना उत्तर देताना परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी काँग्रेस आणि विशेषतः गांधी घराणं यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी माझ्यावर जे आरोप केले आहेत, त्याचे गुन्हेगार काँग्रेसचे नेतेच आहेत, अशी परतफेड सुषमा यांनी बुधवारी लोकसभेत केली. या प्रकरणात मी कोणतीही चूक केलेली नाही, याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

ललित मोदी प्रकरणामुळे कोंडीत सापडलेल्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी आज काँग्रेसवर जोरदार पलटवार केला. 'राहुलजी, क्वात्रोचीकडून किती पैसे घेतले हे आधी मम्माला विचारा' असं सुनावत बोफोर्स, भोपाळकांड आणि राहुल गांधी यांच्या बहुचर्चित सुट्टीचा त्यांनी समाचार घेतला. सुषमा बोलत असताना 'प्रधानमंत्री सदन में आओ', 'प्रधानमंत्री चुप्पी तोडो', 'झुठा बयान नही चलेगा', अशा अखंड घोषणा लोकसभेत काँग्रेसचे सदस्य करत होते.

'राहुल गांधी यांना सुट्टीवर जाण्याची भारी हौस आहे. त्यांनी आणखी एक सुट्टी घ्यावी आणि एकांतात बसून आपल्या कुटुंबाचा इतिहासाचा वाचावा म्हणजे भूतकाळात काय काय घडलं याची त्यांना कल्पना होईल', असा टोला लगावत सुषमा यांनी गांधी घराण्याला लक्ष्य केलं. ललित मोदी प्रकरणात मी कोणता आर्थिक व्यवहारही केलेला नाही, उलट काँग्रेसने देशाच्या गुन्हेगारांना मदतीचा 'हात' दिलेला आहे. भोपाळ गॅस दुर्घटनेला जबाबदार असलेल्या अँडरसनला भारतातून पळून जाण्यासाठी राजीव गांधी यांनी मदत केली होती. राजीव यांनी अमेरिकेतील आपल्या मित्राचा गुन्हेगार मुलगा आदिल शहरयारच्या सुटकेच्या बदल्यात अँडरसनला मुक्त केलं होतं. बोफोर्स घोटाळ्यातील आरोपी क्वात्रोचीही काँग्रेसमुळेच पळाला', असा आरोप स्वराज यांनी केला.

ललित मोदी काँग्रेसच्या चुकांमुळेच लंडनमध्ये आहे. गेल्या चार वर्षांपासून मोदीची फाइल एक इंचही पुढे सरकलेली नाही. सक्तवसुली संचालनालयाने कोणतीही कारवाई केली नाही. सुप्रीम कोर्टातही याप्रकरणी कोणतंही अपील करण्यात आलेलं नाही, असं स्वराज म्हणाल्या. 'ललित मोदी प्रकरणात मी काहीही चुकीचं केलेलं नाही. मोदीच्या पासपोर्ट केसमध्ये माझे पती वकील नाहीत. माझी मुलगी बासुरीने एकही पैसा कुणाकडून घेतलेला नाही', असं सुषमा यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. गेल्या 38 वर्षांपासून मी राजकारणात आहे. एखाद्या तपस्येसारखी माझी कारकीर्द राहिली. माझ्यावर एकही आरोपाचा डाग लागू दिला नाही. संयमाने आणि मर्यादेत राहून मी राजकारण केलं, असंही सुषमा यांनी विरोधकांना सुनावलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 12, 2015 06:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close