S M L

यूएई भारतात करणार 4.5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक

Samruddha Bhambure | Updated On: Aug 18, 2015 03:46 PM IST

यूएई भारतात करणार 4.5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक

18 ऑगस्ट : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संयुक्त अरब अमिरातचा दौरा अनेक अंगांनी महत्त्वाचा ठरला. या दौर्‍यानंतर संयुक्त अरब अमिरात भारतात साडे चार लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचं पंतप्रधान मोदींनी सांगितलं. तसंच या दौर्‍यामध्ये पंतप्रधानांनी पाकिस्तानचा थेट उल्लेख केला नसला तरी गुड टेररिझम आणि बॅड टेरेरिझम दोन्हींचं उच्चाटन व्हायला हवं, असं परखड मत मांडलं. या दौर्‍यात भारत आणि यूएईदरम्यान संरक्षण, सुरक्षा, व्यापार यावर चर्चा झाली. पंतप्रधानांच्या दौर्‍याचा शेवट झाला तो दुबईतल्या क्रिकेट स्टेडियमवर भारतीयांसमोर मोदींनी केलेल्या भाषणाने... या भाषणाने पुन्हा एकदा अमेरिकेतल्या मेडिसन स्क्वेअर आणि ऑस्ट्रेलियातल्या मेलबर्नमध्ये केलेल्या भाषणाची आठवण करून दिली. 40 हजारांचा जनसमुदाय मोदींसमोर होता. जवळपास 1 तास 10 मिनिटं मोदींनी भाषण केलं. संपूर्ण भाषणादरम्यान मोदी, मोदीचा जयघोष सुरू होता.

दोन दिवसांच्या संयुक्त अरब अमिरातीच्या (युएई) दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी काल मध्यरात्री नवी दिल्लीत परतले. दोन दिवसांच्या दौर्‍यामध्ये मोदी यांनी अबु धाबी, हायटेक मस्दर सिटी आणि दुबईला भेट दिली. युएई दौर्‍याच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधानांनी दुबई क्रिकेट मैदानावर जवळपास 50 हजार अनिवासी भारतीयांना संबोधित केलं. त्याआधी त्यांनी अबु धाबी इथल्या नियोजनबद्ध शहर प्रकल्पाची पाहणी केली. तसंच तेथल्या उद्योगपतींशी चर्चा केली. त्यांना भारतात गुंतवणुकीचे निमंत्रण दिले. आपल्या दौर्‍याच्या पहिल्या दिवशी पंतप्रधानांनी अबु धाबी येथील मशिदीलाही भेट दिली. हा दौरा आपल्या दृष्टीनं महत्त्वाचा आणि चांगला झाल्याचं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.

युएईच्या दौर्‍यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिथल्या नेत्यांशी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. त्यानुसार दोन्ही देशांदरम्यान संरक्षण, सुरक्षा संबंध आणखी दृढ करण्यावर भर दिला जाणार आहे. दहशतवाद विरोधी मोहिमा, पैशांच्या अफरातफरीला आळा घालणे, अंमली पदार्थांची तस्करी आणि दोन्ही देशांमधून केले जाणारे गुन्हे यांना तोंड देण्यासाठी दोन्ही देशांनी एकत्रितपणे काम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासोबतच मोदींबरोबर झालेल्या चर्चेमध्ये संयुक्त अरब अमिरातीनं भारतात सोन्यावर असलेल्या आयात शुल्काचा मुद्दा उपस्थित केला. भारतामध्ये सोन्याला प्रचंड मागणी आहे. त्याच्या आयातीमध्ये जास्त परकीय चलन खर्च होऊ नये, यासाठी त्यावर जास्त आयात शुल्क लावण्यात आलंय. भारत संयुक्त अरब अमिरातीकडूनही मोठ्या प्रमाणात सोनं आयात करतो. त्यांना या मोठ्या आयात शुल्काचा फटका बसतो.

दुबई क्रिकेट स्टेडियममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 50 हजार अनिवासी भारतीयांना संबोधित केलं. इथ येण्याचा अनुभव आनंददायक असल्याचा म्हणत दुबई आणि अबुधाबित अत्यंत प्रेमान स्वागत केल्याबद्दल मोदीनी आभार मानले. मी हे प्रेम कधीच विसरणार नाही हा कुणा एका व्यक्तीवर नाही तर सव्वाशे कोटी भारतीयांचा सन्मान आणि बदलत्या भारताचा सन्मान असल्याचंही ते म्हमाले. तर, जगभरातून लोक दुबईत येतात दुबईच आकर्षण जगाला आहे, दुबईत भारतातून आठवड्याला सातशे फ्लाईट्स येतात मात्र भारताच्या पंतप्रधानाला दुबईत यायला 34 वर्ष लागली,असा टोलाही मोदींनी लगावला. भारतात संकट आलं तर दुबईतले नागरिक मदतीला येतात,दुबई लघु भारतच नव्हे तर लघु विश्व असल्याच ते म्हणाले. यावेळी त्यांनी अनेक घोषणा केल्या. पंतप्रधानांनी पूर्ण भाषणात पाकिस्तानचा उल्लेख टाळला. दहशतवादाला सीमा नाही, भारतासमोर दहशतवादाचं संकट, दहशतवादाचा सर्वांनी एकत्र येवून मुकाबला करावा लागेल असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी परदेशी राहणार्‍या भारतीयांसाठी एक पोर्टल सुरु करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. `MADAT` नावाचं पोर्टल असेल. तसंच https://emigrate.gov.in यावर अनिवासी भारतीय आपल्या तक्रारी नोंदवू शकतात आणि मदत मागू शकतात. परदेशातल्या भारतीयांच्या मदतीसाठी indian community welfare fund ची निर्मिती करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं.

या भाषणादरम्यान, पंतप्रधान मोदींनी अर्थकारणावरही भर दिला. भारताची 65 टक्के लोकसंख्या 35 वर्षांच्या खालची आहे. भारत हा तरुणांचा देश आहे, असं मोदी म्हणाले. मेक इन इंडियाचा उल्लेख त्यांनी या भाषणात केला. भारतामध्ये खूप संधी असल्याचं आम्ही जगाला सांगत आहोत असं ते म्हणाले. सर्व रेटिंग एजन्सीज भारताबद्दल विश्वास दाखवत आहेत, त्यामुळे देशात गुंतवणुकीसाठी चांगलं वातावरण असल्याचं मोदी म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 18, 2015 09:21 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close