S M L

अखेर गीता भारतात परतली

Sachin Salve | Updated On: Oct 26, 2015 02:43 PM IST

अखेर गीता भारतात परतली

geeta_back in india26 ऑक्टोबर : पाकिस्तामध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून राहणारी गीताअखेर 15 वर्षांनतंर भारतात परतली. सकाळी 11.30 वाजता गीताचं नवी दिल्लीच्या विमानतळावर आगमन झालं. तिचं दिल्लीतल्या पाक दुतावासाच्या अधिकार्‍यांनी स्वागत केलं. गीताचे कुटुंबीयही या स्वागताला हजर होते. गीता आल्यानंतर एअरपोर्टवरचे जमलेले सगळे भावूक झाले होते. गीताची आधी डीएनए चाचणी होणार आहे आणि डीएनए रिपोर्ट आल्यानंतर तीला तिच्या परिवाराकडे सुपूर्द केलं जाईल. गीता एअरपोर्टवरुन नेहरु भवन इथं परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना भेटण्यासाठी गेली आहे अशीही माहिती मिळतेय.

गीताची कहाणी

सलमान खानच्या बजरंगी भाईजान सिनेमामुळे गीता पाकिस्तानातून भारतात परत येऊ शकलीय. त्यामुळेच तिला सलमान खानला भेटायचंय. पण भारतातून चुकून पाकिस्तानात गेलेल्या गीताची कहाणी खूपच हृदयस्पर्शी आहे. गीता पाकिस्तानात कशी गेली ? तिथे गेल्यावर नेमकं कायकाय घडलं.. हा प्रवास खूपच मोठा आहे. आता गीता 22 वर्षांची आहे. पण पाकिस्तानात गेली तेव्हा ती अवघ्या 8 वर्षांची होती.

सलमान खानच्या बजरंगी भाईजान या सिनेमामुळे आपलं आयुष्यच पालटून जाईल, असं तिला स्वप्नातही वाटलं नसेल. पण

सलमानच्या सिनेमाची कथा गीताच्या रूपाने प्रत्यक्षात घडतेय. पाकिस्तानातून चुकून भारतात आलेल्या मुन्नीला म्हणजेच शाहिदाला

सलमान खान पाकिस्तानात नेऊन पोहोचवतो, अशी या सिनेमाची कथा... इथे मुन्नीच्या जागी गीता आहे...मुन्नी भारतातून पाकिस्तानात परत गेली.. गीता पाकिस्तानातून भारतात परत येतेय... तेही 14 वर्षांनी ...समझौता एक्स्प्रेसमधून चुकून पाकिस्तानात गेली तेव्हा गीता अवघी 8 वर्षांची होती. रस्ता चुकलेल्या या मुलीला लाहोरमध्ये पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि पाकिस्तानातल्या इधि या स्वयंसेवी संस्थेकडे सोपवलं. या अनाथालयात आलेली ही मुलगी हिंदूधर्मीयांप्रमाणे पूजाअर्जा करायची..म्हणून तिचं नाव ठेवलं गीता.

गीताला बोलता येत नाही...आणि ऐकूही येत नाही. ती फक्त खाणाखुणांच्या भाषेनंच संवाद साधू शकते. थोडी मोठी झाल्यावर तिने तिच्या डायरीमध्ये काही नोंदी केल्या होत्या खर्‍या.. पण त्यावरूनही तिच्या आईवडिलांबद्दल, तिच्या गावाबद्दल फारसं काही कळत नव्हतं. इधि संस्थेचे फैजल इधि आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी तिच्या कुटंुबीयांचा ठावठिकाणा काढण्याचा प्रयत्न केला पण त्यालाही यश आलं नाही.

पण गीताच्या कहाणीला नवं वळण मिळालं. तिने सलमान खानचा बजरंगी भाईजान हा सिनेमा पाहिला तेव्हा...या सिनेमामध्ये

भारतातून पाकिस्तानात गेल्यावर आपल्या आईला गदगदून भेटणार्‍या मुन्नीला पाहून गीताला रडू कोसळलं. सलमानने मुन्नीसारखंच आपल्यालाही भारतात नेऊन सोडलं तर...गीताच्या मनानं पुन्हा उचल खाल्ली. इधिच्या फैजलभाईंनीही पुन्हा प्रयत्न सुरू केले.

इधि च्या कार्यकर्त्यांनी मग सलमान खानलाच गीताला भारतात घेऊन जाण्याचं आवाहन केलं. भारतीय उच्चायुक्तालयाचे अधिकारी, परराष्ट्र मंत्रालय... सलमान खान...प्रसारमाध्यमं... सगळेच जण गीताच्या आईवडिलांना शोधण्याचा प्रयत्न करत होते. आधी चार जोडप्यांनी गीता ही आपलीच मुलगी आहे, असा दावा केला होता. पण मग बर्‍याच प्रयत्नांनतर गीताच्या खर्‍या आईवडिलांचा शोध लागला.

गीता ही बिहारमधल्या महातो दांपत्याची मुलगी आहे. गीता ही यात्रेमध्ये हरवली होती, असं त्यांनी म्हटलंय. आईवडिलांपासून ताटातूट झालेली गीता पाकिस्तानात गेली. पाकिस्तानच्या नागरिकांनी तिचा इतक्या मायेनं सांभाळ केला.आणि आता ही भारतीय मुलगी पुन्हा 14 वर्षांनी आपल्या मुलखात येतेय. भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या खूप तणावाची स्थिती आहे. पण या तणावातही गीता ही दोन देशांमधल्या प्रेमाची आणि मानवतेची मिसाल बनून राहिली आहे.

इधिचा निरोप

गीता पाकिस्तानात कराचीमध्ये ज्या इधि संस्थेत होती त्या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी तिला पाकिस्तानातून निघताना निरोप दिला.

त्यावेळी इधि संस्थेचे फैजल इधि आणि कार्यकर्त्यांनी गीताला शुभेच्छा दिल्या.. भेटवस्तू दिल्या...कराचीमधल्या इधिच्या अनाथालयातल्या आपल्या सगळ्या मैत्रिणींचाही गीताने निरोप घेतला. इधि या संस्थेचं कराचीमध्ये मुली आणि महिलांसाठी अनाथालय आहे. इथेच गीता 14 वर्ष राहिली. त्यामुळे गीताला निरोप देताना इधिचे कार्यकर्तेही भावनिक झाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 26, 2015 08:22 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close