S M L

युपीएच्या कार्यकाळात पंतप्रधान पदाचं झालं अवमुल्यन - पवार

Samruddha Bhambure | Updated On: Dec 11, 2015 09:14 PM IST

 युपीएच्या कार्यकाळात पंतप्रधान पदाचं झालं अवमुल्यन - पवार

11 डिसेंबर : राष्ट्रीय सल्लागार परिषदेमुळे युपीएच्या कार्यकाळात पंतप्रधान पदाचं अवमुल्यन झाल्याचा गंभीर आरोप शरद पवारांनी केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचा अमृत महोत्सवी सोहळा काल (गुरूवारी) नवी दिल्लीत मोठ्या दिमाखात झाला. त्यावेळेला दोन पुस्तकांचं प्रकाशनही झालं. पण आता शरद पवारांच्या आत्मकथनामुळे खळबळ उडाली आहे. शरद पवारांच्या 'लोक माझे सांगाती' या आत्मकथनात अनेक खुलासे करण्यात आले आहेत. पवारांच्या या खुलाशामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

पवारांनी काय म्हटलंय पुस्तकात?

राष्ट्रीय सल्लागार परिष्देच्या अनेक निर्णयांशी डॉ.मनमोहन सिंग आणि पी.चिदंबरम असहमत असायचे, पण 'सुपर कॅबिनेट'ची भूमिका बजावणार्‍या 'राष्ट्रीय सल्लागार परिषदे'च्या निर्णयांना मान तुकवणं त्यांना भाग पडत होतं. या हस्तक्षेपाचे सरकारच्या निर्णयावर दुहेरी परिणाम होत होते. एक म्हणजे, यातले काही निर्णय आर्थिकदृष्ट्या न परवडणारे होते.

सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालची 'राष्ट्रीय सल्लागार परिषद' आता निर्णयप्रक्रियेत अधिकच वर्चस्व गाजवू लागली. सरकारचं धोरण काय आणि कसं असावं, सचिवांच्या बदल्या आणि नियुक्त्या, सरकारमधल्या महत्त्वाच्या संस्थांमधल्या नेमणुका यांबाबतचे आदेश थेट 'राष्ट्रीय सल्लागार परिषदे'कडून येऊ लागले. अशा असाधारण हस्तक्षेपामुळे 'पंतप्रधान' या संस्थेचं अवमूल्यन झालं. महत्त्वाचे प्रमुख निर्णय 'राष्ट्रीय सल्लागार परिषदे'त घेतले जात, ते पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवले जात आणि तिथून संबंधित मंत्रालयांना पोचवले जात. याबाबत फक्त माझ्या मंत्रालयाचा अपवाद करण्यात आला होता.

माझ्या मंत्रालयात कुणाचा हस्तक्षेप नसला, तरी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अधिकारांवर ज्या पद्धतीनं अतिक्रमण केलं गेलं होतं, त्याच्याबद्दल मी नाराज होतो आणि या सार्‍याचा मला प्रचंड उद्वेग आला होता. डॉ.मनमोहन सिंह यांच्या योगदानाबद्दल, त्यांच्या विद्वत्तेबद्दल, त्यांच्या हेतूंबद्दल पूर्ण आदर बाळगूनही, सरकारच्या प्रमुखानं देशहिताच्या दृष्टीनं अधिक कणखर भूमिका घ्यायला हवी होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 11, 2015 07:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close