S M L

राजपथावर लष्कारी सामर्थ्याचं आणि संस्कृतीचं दर्शन

Sachin Salve | Updated On: Jan 26, 2016 06:30 PM IST

राजपथावर लष्कारी सामर्थ्याचं आणि संस्कृतीचं दर्शन

नवी दिल्ली - 26 जानेवारी : आज 26 जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिन...देशभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह आहे. नवी दिल्लीत राजपथावर लष्करी सामर्थ्य आणि संस्कृतीची झलक पाहण्यास मिळाली. शानदार असा संचलन सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याला फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्स्वा ओलांद हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, मंत्रिमंडळातील प्रमुख नेते आणि प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते लांस नायक मोहन नाथ गोस्वामी यांना मरणोत्तर अशोकचक्र प्रदान करण्यात आलं. गोस्वामी यांच्या कुटुंबियांनी हा सन्मान स्विकारला.

6 नोव्हेंबर 1949 रोजी भारताची राज्यघटना स्विकारली गेली. 26 जानेवारी 1950 रोजी ही राज्यघटना स्विकारली गेली. त्यामुळे हाच दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जात आहे. आज राजपथावर 'याची देही याचा डोळा' असा रोमहर्षक सोहळा पार पडला. लष्कराची ताकद, संस्कृतीचं दर्शन घडवणारे विविध राज्याचे चित्ररथांनी सर्वांचं लक्ष वेधलं. लष्कराच्या तिन्ही दलांनी थरारक असे प्रात्यक्षिक सादर करुन उपस्थितांची मनं जिंकली. वायुसेनेनं सादर केलेल्या एअर शोनं उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकवला. परेडच्या सुरुवातील मिसाईल आणि रणगाड्याच्या सामर्थ्याचं दर्शन घडलं. तसंच विविधतेनं नटलेल्या भारताचं दर्शनाची झलकही पाहण्यास मिळाली. काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत सर्वच राज्यांनी आपल्याचा राज्याचा ठसा उमटवत शानदार असे चित्ररथ सादर केले.

फ्रेंच सैनिकांचं शिस्तबद्ध संचलन

विशेष म्हणजे यावर्षी आकर्षण होते ते फ्रान्सचे सैन्य दल. 130 फ्रेंच सैनिकांनी शिस्तबद्ध असं संचलन केलं. फ्रेंच सैनिकांचं बँड पथक आणि सैनिकांनी परेड केली. प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये पाहुणे म्हणून मागील वर्षी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा उपस्थित होते. यावेळी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्स्वा ओलांद उपस्थित होते. एवढंच नाहीतर फ्रेंच सैनिकांनी परेडमध्ये सहभाग घेत नवा पांयडा पाडला.

26 वर्षांनंतर श्वान पथक अवतरले

तसंच तब्बल 26 वर्षांनी लष्कराचं श्वान पथक परेडमध्ये सहभागी झालं होतं. 36 श्वान आणि त्यांचे प्रशिक्षक परेडमध्ये सहभागी झाले होते. 36 पैकी 12 लॅब्राडॉग तर 12 जर्मन शेफर्ड जातीचे श्वान यात सहभागी होते. परंतु, यंदा महाराष्ट्राचा चित्ररथ नसल्यामुळे मराठीजनांची हिरमोड झाली. मागील वर्षी वारीचा देखावा सादर करुन महाराष्ट्राच्या चित्ररथाने प्रथम क्रमांक पटकावला होता.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 26, 2016 12:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close