S M L

मृत्यूला चकवा देणार्‍या वीरजवानाची अजूनही मृत्यूशी झुंज सुरूच

Sachin Salve | Updated On: Feb 10, 2016 11:29 AM IST

मृत्यूला चकवा देणार्‍या वीरजवानाची अजूनही मृत्यूशी झुंज सुरूच

नवी दिल्ली - 10 फेब्रुवारी : उणे 50 सेल्सियस तापमान, 19,500 फूट उंचावर 25 फूट बर्फाच्या ढिगाखाली मृत्यूशी झुंज देऊन सुखरुप बाहेर आलेल्या वीर जवान हनुमंथप्पा कोप्पाड यांची अजूनही मृत्यूशी झुंज सुरूच आहे. नवी दिल्लीतील हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर काळजीपूर्वक उपचार सुरू आहे. पुढील 24 तास त्यांच्यासाठी महत्त्वाची आहे. या वीरजवानासाठी देशभरातून प्रार्थना केली जात आहे.

भारतीय जवान सीमेवर आपल्या जीवाची बाजी लावून देशाचं रक्षण करता. पण, सियाचीन सारख्या युद्धभूमीवर जिथे निसर्गाचं राज्य चालतं, तिथे श्वास सुद्धा त्याच्या मर्जीने घ्यावा लागतो अशा ठिकाणी बहादुर जवान आपला जीव मुठीत धरून खडा पहारा देता. उणे 50 सेल्सिस तापमान, 19,500 फूट उंचावर सर्वसामान्यांना तग धरणे कठीणच. पण, अशा या परिस्थिती पहारा देणार्‍या मद्रास रेजिमेंटच्या 10 जवानांवर निसर्गाचा कोप झाला. हिमस्खलन झाल्यामुळे दहा जवान बर्फाच्या ढिगाखाली जिवंत गाडले गेले.

दोन दिवसांच्या शोध मोहिमेनंतर 10 जवान शहीद झाल्याचं जाहीर करावं लागलं. पण, 'देव तारी त्याला कोण मारी' असं सिद्ध करत हणुमंथप्पा कोप्पाड या जवानाने मृत्यूला चकावा दिला. 6 दिवस 25 फूट बर्फाखाली राहुन त्याने निसर्गाच्या या राज्याला आव्हानच दिलं. निसर्गापुढे कुणाच काही चालत नाही असं आपण सहज म्हणतो पण, हणुमंथप्पा यासाठी अपवाद आहे. चमत्कारिकरित्या बचावलेल्या या वीर जवानांना तातडीने आधी बेसकॅम्पवर आणण्यात आलं आणि तिथून विशेष एअरऍम्बुलन्सने दिल्लीतील रिसर्च अँड रेफरल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वीर जवानाच्या साहसाला सॅल्युट करत सर्व प्रोटोकॉल बाजूला सारत थेट हॉस्पिटल गाठले. मोदींनी हणुमंथप्पाच्या तब्येतीची चौकशी केली. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना केली.

हणुमंथप्पा यांना न्युमोनिया झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. ते सध्या कोमात आहेत आणि त्यांचा रक्तदाबही खालावलाय. किडनी आणि लिव्हर काम करत नसल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आलंय. पुढील 24 तास त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. इतक्या मोठ्या कालावधीपर्यंत हिमस्खलनातून वाचलेले ते पहिलेच जवान आहेत. त्यांचे कुटुंबीय धारवडवरून दिल्लीत दाखल झाले आहे. त्यांचं 4 वर्षांपूर्वी लग्न झालंय आणि त्यांना एक 2 वर्षांची मुलगी आहे. या वीर जवानासाठी देशभरातून प्रार्थना केली जात आहे. बॉलिवूडचा शहेनशहा अमिताभ बच्चन, लता मंगेशकर आणि मास्टर ब्लॉस्टर सचिन तेंडुलकर यांनीही ट्विटवर हणुमंथप्पा यांच्यासाठी प्रार्थना केलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 10, 2016 10:23 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close