S M L

'स्वाभिमान'च्या कार्यकर्त्यांची श्रीहरी अणेंवर शाईफेक

Sachin Salve | Updated On: Mar 31, 2016 02:21 PM IST

'स्वाभिमान'च्या कार्यकर्त्यांची श्रीहरी अणेंवर शाईफेक

दिल्ली -31 मार्च : दिल्लीत जंतरमंतर मैदानावर विदर्भवादी कार्यकर्त्यांच्या आंदोलनादरम्यान माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांच्यावर शाईफेक करण्यात आलीये. काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांच्या स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अणेंवर शाईफेक केलीये. शाईफेकीच्या घटनेनंतर विदर्भवादी कार्यकर्ते आणि स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली.

वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी दिल्लीत जंतरमंतरवर विदर्भवादी कार्यकर्ते शक्तिप्रदर्शन करण्यासाठी एकवटले होते. केंद्र सरकारनं वेगळ्या विदर्भाचे आश्वासन पूर्ण करावं अशी विदर्भवाद्यांची मागणी आहे. या कार्यक्रमाला माजी महाधिवक्ते श्रीहरी अणेंसह सगळ्या पक्षांचे विदर्भवादी नेते एकत्र जमले होते.

श्रीहरी अणे भाषणासाठी उभे राहिले असता स्वाभिमान संघटनेचे कार्यकर्ते काळे झेंडे घेऊन आंदोलनाच्या ठिकाणी आले. अणेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देण्यास सुरुवात केली आणि अणेंवर काळी शाई फेकली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. विदर्भवादी कार्यकर्ते आणि स्वाभिमानच्या कार्यकर्त्यामध्ये तुफान हाणामारी झाली. लाठ्या-काठ्या घेऊन कार्यकर्ते एकमेकांवर तुटून पडले होते. पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.

मात्र, कुणाच्या तोंडावर शाई फेकून आंदोलन थांबवता येत नाही. आता विदर्भासाठी रक्त सांडलं तरी चालेल असा संताप श्रीहरी अणेंनी व्यक्त केला. तसंच मराठवाड्याला स्वता:ची भूमिका मांडवी लागेल. माझ्या हातावर शाईचे डाग आणणार्‍या पश्चिम महाराष्ट्राच्या नेत्यांना त्यांच्या हातावर रक्ताचे डाग हवे नसेल तर वेगळा विदर्भ द्या अशी मागणीही अणेंनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 31, 2016 02:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close