S M L

'नीट' संदर्भातील याचिकेवर उद्या होणार सुनावणी

Samruddha Bhambure | Updated On: May 5, 2016 09:25 PM IST

neet_exam

मुंबई – 05 मे :   नॅशनल एलिजिबीटी टेस्ट अर्थात 'नीट' संदर्भात सुप्रीम कोर्टात आज (गुरूवारी) ही काही ठोस निर्णय झाला नाही. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी उद्यापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. महाराष्ट्रासह एकूण 8 राज्यांनी या नीट परीक्षेला आणि त्याच्या तात्काळ अंमलबजावणीला विरोध दर्शवला आहे. त्यामुळे कोर्टात नीट परीक्षेचा निकाल काय लागणार, याबाबत पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये धाकधूक आहे.

याआधीही सुप्रीम कोर्टानं केंद्रासह पालक आणि विद्यार्थ्यांनी केलेल्या स्वतंत्र पुनर्विचार याचिका फेटाळून लावल्या आहेत. मेडिकल प्रवेशासाठी संपूर्ण देशात एकच परीक्षा असावी, असा निर्णय कोर्टानं दिला आहे. मात्र, ती परीक्षा यंदापासून लागू करावी, असंही कोर्टानं म्हटल्यानं ऐनवेळेस विद्यार्थ्यांची अभ्यासासाठी मोठी धावपळ होणार आहे.

महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, जम्मू-काश्मीर या राज्यांसह काही खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनी 'नीट' परीक्षेसंबंधीच्या आदेशात फेरबदल करण्यासाठी याचिका केल्या आहेत. महाराष्ट्र विधिमंडळाने स्थापन केलेल्या वैधानिक बोर्डाद्वारे CETपरिक्षा घेतली जाते. आज झालेल्या सुनावणीत महाराष्ट्राने आपलं म्हणणं मांडलं. राज्यातील अनेक विद्यार्थी मराठी माध्यमाचे तसंच ग्रामीण भागातील आहेत, त्यामुळे यावर्षीपासून नीट लागू करणं त्यांच्यावर अन्यायकारक ठरेल, अशी भूमिका राज्याने न्यायालयात मांडली. त्याचप्रमाणे 2018 पासून महाराष्ट्रात नीट लागू करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

दरम्यान, राज्यात आज 4 लाख 9 हजार विद्यार्थ्यांनी एमएचटीसीटीची परीक्षा दिल्याची माहिती राज्य सरकारने न्यायालयात दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 5, 2016 09:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close