S M L

स्मृती इराणींचे पंख छाटले !

Sachin Salve | Updated On: Jul 6, 2016 12:38 PM IST

स्मृती इराणींचे पंख छाटले !

06 जुलै : 'सबका साथ, सबका विकास' नारा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या छोटेखानी टीमला घेऊन देशाचा गाडा हाकण्यास सुरूवात केली. मोदींच्या टीममध्ये स्मृती इराणी यांच्याकडे मनुष्यबळ विकास मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली. पण, इराणी सुरुवातीपासूनच या ना त्या आरोपांमुळे चांगल्या अडचणीत सापडल्या होत्या. इराणींच्या शिक्षणाचा वाद असो की हैदाराबाद विद्यापीठात दलित विद्यार्थी संघटनेवर बंदीची मागणी अशा अनेक निर्णयामुळे स्मृती इराणी वादच्या भोवर्‍यात सापडल्या होत्या. अखेर नरेंद्र मोदी यांनी 'वाद नको, काम करा' असा कानमंत्र देत स्मृती इराणी यांचे पंख छाटले आहे.

काल मंगळवारी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. 19 जणांना संधी देण्यात आली तर 5 जणांचे राजीनामे घेऊन गच्छंती करण्यात आलीये. यात सर्वात मोठा धक्का बसला तो स्मृती इराणी यांना. स्मृती इराणी यांच्याकडे असलेलं मनुष्यबळ विकास मंत्रालय काढून घेण्यात आलं. या विभागाची जबाबदारी आता प्रकाश जावडेकर यांच्यावर सोपवण्यात आलीये. इराणींकडे आता वस्त्रोद्योग मंत्रालय देण्यात आलंय. स्मृती इराणी यांच्याकडे मनुष्यबळ विकास मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली तेव्हा त्यांच्या शिक्षणावर संशय घेण्यात आला. त्यांच्याकडे पदवीच नसल्याचा आरोप काँग्रेसने केला होता.

ते होत नाही केंद्रीय विद्यालयांमध्ये तिसरी भाषा म्हणून संस्कृत भाषा सक्तीचा निर्णय इराणी यांनी घेतला. यावर चौफेर टीका झाल्यानंतर हा निर्णयही गुंडाळण्यात आला. हैदाराबादमध्ये रोहित वेमुल्ला आत्महत्या प्रकरण आणि जेएनयू वादात स्मृती इराणी यांची चांगलीच कसोटी लागली होती. त्यामुळे लोकसभेत स्मृती इराणी यांना जाहीर खुलासाही करावा लागला. पण, स्मृती इराणी इतक्यात बॅकफूटवर जाणार नव्हत्या. शिक्षणाचं राजकारण करू नका, मी तुम्हाला देशप्रेमाचं सर्टीफिकेट देत नाही, पण तुम्ही माझ्यावर देशप्रेमाचा संशय घेऊ नका असं भावूक आवाहनच इराणी यांनी भर लोकसभेत केलं होतं.

इराणी यांच्यावर विरोधकांनीच लक्ष केलं नाही तर त्यांच्याच खात्यात काम करणारे अनेक अधिकारीही त्यांच्यावर नाखुश होते. त्यांच्या विभागात त्यांच्या निर्णयामुळे म्हणा किंवा वागण्यामुळे अनेक अधिकार्‍यांनी मनुष्यबळ विकास मंत्रालय सोडले. त्यांच्या अशा वागण्यामुळे अनेक वेळा मोदींकडे तक्रारींचा पाऊस पडला. पण, मोदींनी यावर मौन बाळगत उत्तर देणं टाळलं. अखेर मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या निमित्ताने स्मृती इराणी सारख्या अनुभवी नेत्याची खुर्ची हिसकावून मोदींनी आपल्या टीमच्या सर्व सदस्यांना खणखणीत संदेश दिलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 6, 2016 10:31 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close