S M L

केंद्र सरकारला चपराक, अरुणाचलमध्ये काँग्रेसची सत्तावापसी

Sachin Salve | Updated On: Jul 13, 2016 02:22 PM IST

केंद्र सरकारला चपराक, अरुणाचलमध्ये काँग्रेसची सत्तावापसी

दिल्ली, 13 जुलै : उत्तराखंडपाठोपाठ सुप्रीम कोर्टाने मोदी सरकारला आणखी दणका दिलाय. अरुणाचल प्रदेशात काँग्रेसची राजवट पुन्हा बहाल करण्याचे आदेश आणि तिथली राष्ट्रपती राजवट रद्द करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. अरुणाचल प्रदेशातलं लोकनियुक्त सरकार बरखास्त करण्याचा केंद्राचा निर्णय बेकायदेशीर असल्याचा ठपकाही सुप्रीम कोर्टाने ठेवलाय.

राज्यांचे अधिकार आणि त्यामध्ये केंद्राचा हस्तक्षेप याप्रकरणी उत्तराखंडपाठोपाठ केंद्र सरकारला दुसरा मोठा धक्का बसल्याचं मानलं जातंय. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री नबाम तुकी यांच्याविरोधात 21 आमदारांनी बंडखोरी केली, त्यानंतर बंडखोरांचे नेते कालिखो पुल यांनी भाजपच्या 11 आमदारांच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यासाठी अरुणाचलच्या विधानसभेचं अधिवेशन एक महिना आधीच घेण्याचा निर्णय राज्यपाल ज्योती प्रसाद राजखोवा यांनी घेतला होता.

हा निर्णय म्हणजे राज्यघटनेचं उल्लंघन असल्याची चपराकही सुप्रीम कोर्टाने लगावलीये. या निर्णयाचं स्वागत करत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींवर सडकून टीका केलीये.पंतप्रधानांना लोकशाही म्हणजे काय हे शिकवल्याबद्दल राहुल गांधी यांनी सुप्रीम कोर्टाचे आभार मानले आहे.

निदान आतातरी पंतप्रधान मोदी यातून धडा  घ्यावा. आता तरी इतर राज्यांना केंद्र सरकारने नाहक त्रास देऊ नये असा सल्लावजा टोला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लगावला.

 अरुणाचलबद्दलचा निकाल हा केंद्राला मिळालेला धडा आहे. राज्यपालांमार्फत आपल्या संघराज्याशी खेळू पाहणार्‍यांना हा इशारा आहे. सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाच्या या निर्णयामुळे राजकीय नीतीमत्ता आणि दायित्व यांच्याविषयी महत्त्वाचे प्रश्न उपस्थित झाले आहेत. केंद्र सरकारमधील कोणी याची जबाबदारी घेणार आहे का? असा सवाल सीपीएमचे सरचिटणीस सीताराम येंचुरी यांनी उपस्थित केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 13, 2016 02:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close