S M L

एकमेकांशी लढण्याऐवजी गरिबी हटवण्यावर लक्ष देऊया, मोदींचं पाकला आवाहन

Sachin Salve | Updated On: Aug 15, 2016 10:27 AM IST

एकमेकांशी लढण्याऐवजी गरिबी हटवण्यावर लक्ष देऊया, मोदींचं पाकला आवाहन

 

दिल्ली, 15 ऑगस्ट : हा देश हिंसेपुढे झुकणार नाही, हा देश दहशतवादापुढे झुकणार नाही, हा देश माओवादापुढे झुकणार नाही. देशात अशा समाजविघातक तत्वांना थारा नाही अशी शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरुन पाकिस्तानाला सुनावले. तसंच गरिबी ही मोठी समस्या असून त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे, गरिबांची गरिबीतून मुक्ती करण्यासाठी पुढे या असं आवाहनही पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तानला केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते दिल्लीच्या लालकिल्ल्यावर ध्वजारोहण केलं. लालकिल्ल्यावरुन देशाला संबोधित करताना मोदींनी गेल्या दोन वर्षांत सरकारनं केलेल्या कामांचा पाढा वाचला. सरकार महागाई नियंत्रण, महिला सुरक्षा, पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त कारभार यांना प्राधान्य देत असल्याचं मोदींनी सांगितलं. गेल्या 2 वर्षांच्या काळात देशातल्या जनतेचा दृष्टीकोन बदलल्याचंही मोदी म्हणाले. पंतप्रधानांनी आपल्या भाषणात महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांचा उल्लेख करत नमन केलं. या महान व्यक्तींच्या संघर्षामुळे आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले. प्रत्येक भारतीयाने देशासाठी कार्य केले आहे. त्यांच्या योगदानामुळे स्वराज निर्माण झाले आहे. आज या स्वराजाला सुराज्यमध्ये बदलणे हा आमचा उद्देश असून एक भारत, श्रेष्ठ भारत बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे अशी ग्वाही मोदींनी दिली.

सरकारचं ध्येय हे सर्वसामान्यांच्या आयुष्यात बदल घडले पाहिजे. त्यामुळे सरकारने अनेक अशा योजनांची सुरुवात केली. आम्ही नुसत्या योजना सुरू केल्या नाहीतर त्यांची अंमलबजावणी सुद्धा केली. आधार कार्ड, पासपोर्ट आणि आयकर रिफंड सारख्या सुविधा आज जनतेपर्यंत पोहोचल्या असून त्याचा मोठ्या प्रमाणावर फायदा झालाय. पूर्वी पासपोर्टसाठी सहा ते आठ महिने वेळ लागत होता. आता फक्त आठ दिवसांत पासपोर्ट उपलब्ध झाले आहे. आजची परिस्थिती पाहिली तर जवळपास कोट्यवधी लोकं पासपोर्टासाठी अर्ज करत आहे. पूर्वी 20 हजार लोकचं पासपोर्टासाठी अर्ज करत होते. आम्ही 70 कोटी भारतीयांना आधार कार्ड आणि सुरक्षा योजनेशी जोडण्यात यशस्वी झालोय अशी माहितीही पंतप्रधान मोदींनी दिली.

पंतप्रधानांनी आपल्या भाषणात ऊर्जेचा मुद्दावरही भर दिला. वीज वाचवण्यासाठी एलईडी बल्बची निर्मिती झाली. पूर्वी बाजारात एका एलईडी बल्बसाठी 350 रुपये मोजावे लागत होते. पण, सरकारने फक्त 50 रुपयांमध्ये एलईडी बल्ब उपलब्ध करून दिले. आतापर्यंत 13 कोटी एलईडी बल्बचे वाटप झाले आहे. अजून 77 कोटी बल्ब वाटण्याचं आमचं लक्ष आहे. या 70 कोटी एलईडी बल्बमुळे 1.25 लाख कोटींची 20 हजार मेगावॅट वीजचे बचत होईल असं पंतप्रधानांनी सांगितलं. तसंच स्वातंत्र्याच्या 60 वर्षांनंतर फक्त 14 कोटी एलपीजी गॅस कनेक्शन जोडण्यात आले होते. पण, आम्ही फक्त 60 आठवड्यात 4 कोटी नवे कनेक्शन जोडले.

आजपर्यंत आपण अनेक समस्यांचा सामना केलाय. पण अशा समस्या सोडण्यासाठी आपण सक्षम आहोत. भारतात अशा अनेक समस्या आहे पण देशाची 125 कोटीची जनता या समस्यांचा निपटारा करण्यात सक्षम आहे. देशाला अधिक सक्षम करण्यासाठी आपल्या सर्वांना कामाचा वेग वाढवावा लागेल असंही पंतप्रधान म्हणाले.

मागील सरकारने सरकारी खजिना खाली करण्याचं काम केलेय अशी थेट टीका पंतप्रधानांनी आघाडी सरकारवर केली. सरकारच्या कामाची ओळख होण्यापेक्षा देशाची ओळख सर्वदूर होण्यास पहिले प्राधान्य राहिले पाहिजे. पण अहंकार लोकशाहीत चालत नाही. हे आमच्या सरकारचं काम नाही असं म्हणून चालत नाही म्हणून मागच्या सरकारच्या काही योजना आम्ही पुढे नेल्यात अशी ग्वाहीही पंतप्रधानांनी दिली.

लालकिल्ल्यावर भाषणाच्या आधी पंतप्रधानांनी राजघाटावर जाऊन राष्ट्रपती महात्मा गांधी यांना श्रद्धांजली अर्पण केली. लालकिल्ल्यावर स्वातंत्र्य दिन सोहळ्याला माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन, आणि अन्य केंद्रीय मंत्री यावेळी उपस्थिती होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 15, 2016 10:24 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close