S M L

कशासाठी ? तर पाण्यासाठी...!

Sachin Salve | Updated On: Sep 13, 2016 11:47 PM IST

कशासाठी ? तर पाण्यासाठी...!

दिनेश मौर्या, बंगळुरु, 13 सप्टेंबर : कर्नाटक आणि बंगळुरुत कावेरीच्या पाण्यावरुन संघर्ष सुरू आहे. पाण्यावरुन झालेला हा पहिलाच संघर्ष नाही. यापूर्वीही असे अनेक संघर्ष झालेत. आणि भविष्यात होतीलही...भविष्यातली युद्ध पाण्यावरुन होतील हे या संघर्षावरुन अधोरेखित झालंय.

बंगळुरुतली जाळपोळ....तोडफोड...कोट्यवधींच्या मालमत्तेचं नुकसान....हे कशासाठी...तर हे फक्त पाण्यासाठी....भविष्यातली युद्ध पाण्यासाठी होतील याची ही चुणूक....हा संघर्ष कोणत्या दोन देशांमधला नाही. तर हा संघर्ष आहे एकाच देशाचे घटक असलेल्या दोन राज्यांचा....कावेरीच्या पाण्यावरुन कर्नाटक आणि तामिळनाडूत वाद आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा संघर्ष सुरू आहे. सुप्रीम कोर्टाच्या एका निर्णयानं या संघर्षाला हिसेंचे स्वरुप प्राप्त झालं. कर्नाटकातल्या लोकांनी बंगळुरुच्या रस्त्यावर तामिळनाडू पासिंगची दिसेल ती गाडी पेटवून दिली.

कर्नाटकमध्ये तामिळनाडूविरुद्ध जोरदार निदर्शनं सुरू असल्यामुळे आज बंगळुरूमध्ये संचारबंदी लागू करण्यात आलीये. तामिळ युवकाच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे सुरू झालेला संघर्ष हिंसक बनलाय. कर्नाटकमध्ये 105 हून जास्त वाहनं जाळण्यात आली, दुकानंही लुटली. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पत्रकार परिषद घेतली. आणि कोर्टाच्या निर्णयामुळे कर्नाटकवर अन्याय झालाय, असं वक्तव्य केलं.

बंगळुरूसह अनेक शहरांतील शाळा- महाविद्यालये बंद आहेत. बंगळुरूमध्ये ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मेट्रो सेवाही स्थगित करण्यात आली आहे. बंगळुरूतील हिंसक आंदोलनाचे पडसाद तामिळनाडूमध्येही उमटू लागलेत.

हा प्रश्न फक्त या दोन राज्यांचाच नाही. मराठवाड्यात दुष्काळ जेव्हा गंभीर झाला तेव्हा पाण्याची चोरी होऊ लागली. गोदावरीच्या पाण्यासाठी भांडण तंटे होऊ लागले. पोलिसांना कायदा सुव्यवस्था राखण्यासोबतच पाण्याच्या टाक्यांवर पहारा द्यावा लागला. थोड्याफार फरकानं अख्ख्या मराठवाड्यात अशीच स्थिती होती. कर्नाटक काय आणि मराठवाडा काय ही एक चुणूक आहे. भविष्यातल्या संघर्षाची. पाण्यासाठी होणार्‍या युद्धाची..

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 13, 2016 11:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close