S M L

'यादव' परिवारात यादवी; अखिलेश यांनी काकाला मंत्रिमंडळातून हटवलं

Samruddha Bhambure | Updated On: Oct 23, 2016 09:51 PM IST

'यादव' परिवारात यादवी; अखिलेश यांनी काकाला मंत्रिमंडळातून हटवलं

23 ऑक्टोबर : समाजवादी पक्षात पुन्हा 'यादवी' उफाळून आली असून मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आज आपल्या समर्थक आमदारांचा कौल घेतल्यानंतर काका शिवपाल यादव यांच्यासह चार मंत्र्यांची राज्य मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली आहे. अखिलेश यांच्या शिफारशीवरून राज्यपाल राम नाईक यांनी चौघांनाही पदावरून तत्काळ दूर केलं आहे. दरम्यान, अखिलेश यांनी अमर सिंह यांच्या निकटवर्तीय जया प्रदा यांनाही उत्तर प्रदेश चित्रपट विकास परिषदेवरून हटवलं आहे.

अमर सिंह यांच्यासोबत जे कुणी आहेत त्या सर्वांना हटवलं जाईल, असा इशाराच अखिलेश यांनी आमदारांच्या बैठकीत दिला. ज्या व्यक्तीने पक्षात भांडणं लावली त्याला माफी दिली जाणार नाही, असेही त्यांनी सुनावले. अखिलेश यांनी आपल्या शासकीय निवासस्थानी ही बैठक बोलावली होती. या बैठकीला शिवपाल समर्थक आमदारांना बोलावण्यात आले नव्हते. बैठकीत मोबाइल घेऊन जाण्यासही मनाई करण्यात आली होती.

दरम्यान, समाजवादी पक्षातील 'गृहकलह' गंभीर वळण घेत असल्याच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे सुप्रीमो मुलायम सिंह यादव यांनी उद्या, सोमवारी तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीला सर्व आमदार, मंत्री, खासदार, माजी खासदार, माजी आमदार, ब्लॉक प्रमुख व सर्व इच्छूक उमेदवारांना बोलावण्यात आले आहे. बैठकीला अखिलेश यादवही उपस्थित राहणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 23, 2016 09:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close