S M L

स्पेशल रिपोर्ट : यादवांच्या उत्तरप्रदेशात 'महाभारत' !

Sachin Salve | Updated On: Mar 23, 2017 05:47 PM IST

स्पेशल रिपोर्ट : यादवांच्या उत्तरप्रदेशात 'महाभारत' !

24 ऑक्टोबर : महाभारत आजही काळ सुसंगत का वाटतं? ह्या प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर उत्तर प्रदेशात जे काही घडतंय त्यावर नजर टाकायलाच हवी. यादवांच्या ह्या 'महाभारतात' वडील आहेत, त्याच्याविरोधात उभा ठाकलेला मुलगा आहे, चुलता आहे, चुलत चुलता आहे, मानलेले, न मानलेले अशी भावकीही आहे. केंद्रस्थानी नेहमीप्रमाणं आहे सत्ता.

महाभारतातले वेगवेगळे अध्याय, वेगवेगळे प्रसंग, वेगवेगळ्या वेळेत, वेगवेगळ्या रूपात, वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला पहायला मिळतात. आताचा जो अंक घडतोय तो घडतोय उत्तर प्रदेशात. देशातलं सर्वात मोठं राज्य आणि तेही यादवांमध्ये. आज तर ही यादवी उघड उघड पहायला मिळाली. सपाच्या मेळाव्याआधीच लखनौच्या रस्त्यावर कार्यकर्त्यांनी आपसातच राडा करायला सुरुवात केली. पोलीसांसोबतही सपाचे कार्यकर्ते भिडले. पण सगळ्याचं लक्ष होतं ते मेळाव्यातल्या व्यासपीठाकडे

मुलायमसिंग यांच्या ह्या मेळाव्याला अखिलेश येणार का याबाबत उत्सुकता होती. पण अगोदर मुलायमसिंग नंतर शिवपाल यादव आणि नंतर अखिलेश यादव दाखल झाले. मुलायम टोकाचा निर्णय घेत अखिलेशची हकालपट्टी करणार का याची उत्सुकता शिगेला पोहोचलेली. शिवपाल, अखिलेश काय बोलणार याकडंही सर्वांचं लक्ष लागलेलं.

पहिल्यांदा बोलायला उठले ते अखिलेशचे चुलते शिवपाल यादव. त्यांनी उघड उघड अखिलेशवर टीका करायला सुरुवात केली. अखिलेश हा नवा पक्ष काढून इतर पाटीर्ंसोबत आघाडी तयार करणार असल्याचं शपथेवर सांगितलं. तसं अखिलेश बोलला असंही ते म्हणाले. शिवपाल यादव यांच्या बोलण्यावर अखिलेश समर्थक मेळाव्यातच भडकले. घोषणा द्यायला लागले. पण शिवपाल यादव थांबले नाहीत. ज्या अमरसिंह यांच्यावरून यादवी पेटलीय त्यांच्या पायाची धूळही तुम्हाला नसल्याची घणाघाती टीका शिवपाल यादव यांनी अखिलेशवर केली.

एवढंच नाही तर मुलायमसिंगांनी सत्ता हातात घ्यावी अशी मागणीही शिवपाल यादव यांनी करून टाकली. अखिलेशचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून सपाचं काम करतोय असं सांगायलाही शिवपाल यादव विसरले नाहीत.

शिवपाल यादव यांच्यानंतर वेळ आली ती अखिलेश यादव यांनी म्हणनं मांडण्याची. त्यांनी सगळ्यात अगोदर स्वत:बद्दलचा संशय दूर करण्याचा प्रयत्न केला.

अखिलेश स्वतंत्र पक्ष काढण्याच्या तयारीत असल्याची आतापर्यंत चर्चा रंगत आली. पण प्रत्यक्षात मात्र असा कुठलाही पक्ष काढणार नसल्याचं अखिलेशनं जाहीर केलं. त्यामुळे समोरचं वातावरण काहीसं शांत झालं. एवढंच नाही तर नेताजींची म्हणजे मुलायमसिंह यांची इच्छा असेल तर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यायलाही तयार असल्याचं अखिलेशनं जाहीर केलं.

अखिलेश यांच्या बोलण्यात कुठेही राजकीय धमकीचा सूर नव्हता. पण आता लक्ष लागलं ते मुलायमसिंह काय बोलणार याकडं. दोघांचं म्हणनं असं जगजाहीरपणे ऐकल्यानंतर मुलायम बोलायला उभे राहीले. समोर मोठी गर्दी होती. काहीसा गोंधळही. त्यांनी मात्र अखिलेशला एखाद्या हेडमास्तरनं किंवा बॉसनं झापावं तसं झापलं.

ज्या अमरसिंहांना अखिलेशनं काल दलाल म्हटलं होतं तो भावासारखा असल्याचं मुलायमसिंह यांनी ठणकावून सांगितलं. एवढंच नाही तर कठीणप्रसंगी अमरसिंह कसे कामाला आले हे सांगायलाही मुलायम विसरले नाहीत. मुलायमसिंहांनी अमरसिंह यांच्याबद्दल अशी उघड बाजू घेणं अर्थातच अखिलेशना झोंबलं.

तुम्हाला आश्चर्य वाटेल मुलायमसिंह ज्यावेळेस अमरसिंहांवर स्तुतीसुमनं वहात होते त्यावेळेस अखिलेशनं त्यांना मधातच थांबवायचा प्रयत्न केला. काहीही झालं तरी अमरसिंह पार्टीत नको म्हणजे नकोच असं ते जोरात म्हणाले. पण मुलायम थांबतील तर ते नेताजी कसे?

अखिलेश यादव यांचा राग आहे तो शिवपाल यादव आणि अमरसिंह यांच्याबद्दल. त्या दोघांबद्दल नेताजींनी निर्णय घ्यावा अशी अपेक्षा घेऊनच अखिलेश यादव मेळाव्याला आलेले. पण झालं उलटंच. मुलायमसिंहांनी अमरगाथाच गायली आणि अखिलेशनं चक्क शिवपाल यादव यांच्या पाया पडायला लावलं. अखिलेशनेही जे सांगितलं ते केलं. सभा संपली ती कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीतच.

सपातली यादवी संपली का तर त्या प्रश्नाचं उत्तर अर्थातच नाही असं आहे. पण मग ह्या बैठकीचं वैशिष्ठ्य काय? तर जे दोन्ही गट नेताजी नेताजी करतायत ते नेमके कुणाच्या बाजुला आहेत हे पहिल्यांदाच स्पष्ट झालं. म्हणजेच यादवांच्या यादवीतला मुख्य अंक अजून बाकी आहे. अखिलेश राजीनामा देणार का? मुलायमसिंह पुन्हा मुख्यमंत्री होणार का? शिवपाल यादव, अमरसिंह यांचं काय होणार ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणं अजून बाकी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 24, 2016 10:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close