S M L

गांधीजींमुळे खादी दुर्दशा, नोटांवरूनही हटवू - अनिल वीज

Samruddha Bhambure | Updated On: Jan 14, 2017 05:33 PM IST

गांधीजींमुळे खादी दुर्दशा, नोटांवरूनही हटवू - अनिल वीज

13 जानेवारी :  महात्मा गांधी यांचं नाव खादीशी जोडलं गेल्याने खादीची दुर्दशा झाली आहे, असे तारे हरयाणाचे मंत्री अनिल वीज यांनी तोडले आहेत.

खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचं कॅलेंडर आणि डायरीवर महात्मा गांधी यांच्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो छापण्यात आल्याने देशभरातून टीकेची झोड उठत असताना हरयाणाचे आरोग्य मंत्री आणि भाजपचे जेष्ठ नेते अनिल वीज यांनी या वादाच्या आगीत तेल ओतण्याचं काम केलं आहे.

खादीसाठी महात्मा गांधी यांच्यापेक्षा नरेंद्र मोदी हेच योग्य ब्रॅण्ड अॅम्बेसेडर आहेत. जेव्हापासून गांधीजींचं नाव खादीशी जोडलं गेलंय तेव्हापासून खादी व्यवसाय डबघाईला आला आहे, असा अजब तर्कही वीज यांनी मांडला आहे.

खादीसोबत गांधीजींचं नाव असायलाच हवं असं काही पेटंट नाही. त्यामुळे उगाच वाद निर्माण करू नये. मोदींचा चेहरा खादी आणि ग्रामोद्योगच्या कॅलेंडरवर छापताच खादीची विक्री 14टक्क्यांनी वाढली आहे, असा तीरही वीज यांनी मारला.

गंभीर बाब म्हणजे वीज यांनी यावेळी एका प्रश्नाच्या उत्तरात बोलताना भाजप सरकारच्या कार्यकाळातच हळहळू नोटांवरून महात्मा गांधी यांचा फोटो हटवला जाईल, असे विधान केले. वीज तेवढ्यावरच थांबले नाहीत. गांधीजींच्या फोटोमुळे नोटांचं अवमूल्यन झालं आहे, असं वीज म्हणाले.

अनिल वीज यांच्या विधानावर सर्व स्तरांतून टीकेची झोड उठली. पक्षातूनही त्यांच्या विधानाचं कोणी समर्थन केलं नाही. त्यामुळे तोंडघशी पडलेल्या वीज यांनी काही तासांतच माघार घेतली. 'महात्मा गांधी यांच्याबाबत जे विधान मी केलं आहे ते माझं वैयक्तिक मत आहे. कोणाच्याही भावना दुखावू नयेत म्हणून मी हे विधान मागे घेत आहे', असं स्पष्टीकरण वीज यांनी दिले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 14, 2017 05:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close