S M L
  • दरवाढीविरोधात आगडोंब

    Published On: May 24, 2012 05:23 PM IST | Updated On: May 24, 2012 05:23 PM IST

    24 मेपेट्रोल दरवाढ मागे घेण्याच्या मागणीसाठी आज राज्यात सर्व विरोधी पक्षांनी आंदोलन केलं. पेट्रोलच्या किंमतीचा भडका उडाला आणि राज्यभरात त्याचे तीव्र पडसाद दिवसभर असे उमटले. सरकारच्या निर्णयाच्याविरोधात ठिकठिकाणी बंद,रास्ता रोको आणि निषेधाच्या घोषणा गाजत होत्या. डोंबिवलीत आरपीआय कार्यकर्त्यांनी रेल रोको करण्याचा प्रयत्न केला. ऐन गर्दीच्यावेळी कार्यकर्त्यांनी सीएसटीकडे जाणारी लोकल रोखून धरल्यानं काही काळ प्रवाशांचा खोळंबा झाला होता. यानंतर या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.नागपूरमध्ये तर भाजप कार्यकर्त्यांनी हिंसक आंदोलन करत एका बसची तोडफोड केली. तसेच नागपूरच्या दौर्‍यावर आलेले रस्ते वाहतूक मंत्री सी.पी.जोशी यांना काळे झेंडे दाखवून त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.सोलापूरमध्ये भाजपने रास्ता रोको आंदोलन केल्यानं सोलापूर-विजापूर हायवे काहीवेळ ठप्प झाला होता. या आंदोलनात भाजप कार्यकर्ते हे प्रतिकात्मक म्हणुन मोटरसायकलीचं दहन करीत असताना पेटलेल्या मोटरसायकलीतील पेट्रोलचा भडका उडाल्यानं टाकीचा स्फोट झाला. या स्फोटानं लागलेल्या आगीत आमदार देशमुख यांचा हात भाजला. तर दोघं जखमी झाले. सांगलीत शिवसेनेनं बंदची हाक दिली. या बंदला व्यापारी संघटनानंी पाठिंबा दिल्यानं शहरातील सर्व व्यवहार ठप्प झाले होते. तर कोल्हापूरमध्येही शिवसेनेनं बंद पुकारला होता. या बंदलाही चांगली प्रतिसाद मिळाला. त्याचबरोबर पुण्यातही भाजप आणि मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले यावेळी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न करण्यात आला.औरंगाबादमध्ये तर शिवसेनेनं वाहनं ढकलून सरकारचा निषेध केला. रायगड जिल्ह्यात शेकापनं आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. दरवाढ मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. तसेच अहमदनगरमध्येही भाजपनं बैलगाडी मोर्चा काढत सरकारचा निषेध केला. यावेळी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहनही करण्यात आलं. आता जनतेच्या या रोषाची दखल सरकार कशापद्धतीनं घेतं ते महत्त्वाचं ठरणार आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close