S M L
  • सावित्रीच्या लेकींची शिक्षणासाठी वणवण

    Published On: Jun 18, 2012 05:30 PM IST | Updated On: Jun 18, 2012 05:30 PM IST

    दिनेश केळुसकर, रत्नागिरी 18 जूनजिथं मुली मारल्या जातात, तिथं स्त्री-पुरुष प्रमाण व्यस्त असल्याची ओरड होते. पण, स्त्री पुरुष प्रमाणामध्ये राज्यात पहिल्या आणि देशात दुसर्‍या स्थानावर असलेला जिल्हा आहे रत्नागिरी. कोकणातल्या या जिल्ह्यात दर हजार पुरुषांमागे स्त्रियांची संख्या आहे तब्बल 1 हजार 126. तर, सहा वर्षांपर्यंतच्या एक हजार मुलांमागे मुलींची संख्या आहे 942. ही आकडेवारी जरी कौतुकास्पद असली, तरी मुलींची ही संख्या का वाढलेय, हे देखील पाहावं लागणार आहे. मुलगा होईल, या आशेवर इथं सहा सात मुलींना जन्माला घातलं जातंय. त्यामुळे एकीकडे मुळची गरिबी, आणि त्यात सरकारी योजनांपासून वंचितता यामुळे मुलींचे हाल होत आहे.चिपळूणमधल्या मुरडव गावातल्या नारायण आणि निर्मला गांगरकर यांनी मुलगा होईल या आशेवर सहा मुलींना जन्म दिला. त्यातल्या दहावीत असणा-या प्रियांकाला दु:ख वाटतंय ते गरिबीमुळे तिचं शिक्षण थांबेल याची.. "आठवीपर्यंत फक्त पुस्तकं भेटली ..वह्या अशा कुठूनतरी जमवायच्या.." असा सवाल प्रियांका विचारतेय.तर तीची आई निर्मला गांगरकर म्हणतात, ती म्हणते की मला फुडं शिकवा मी कायतरी नोकरी करीन.पन आमची ताकद नाय ना तेवडी शिकवण्याची फुडे.! इच्छा आहे तिची मी नर्सिंग कोरस घेईन कुठं काय करीन . .बाकीच्या मुली कशा जातात..पन आता बघा की बाकी मुली 15 हजार कुठे वीस हजार भरतात तेव्हा त्या नोकरीला लागतात ना.! पन तसं आमच्याजवल भरायला नाय हायत."मोलमजुरीवर उदरनिर्वाह असलेली गांगरकरांसारखी शेकडो कुटुंबं कुणबी समाजात आहेत. वंशाला दिवा मागणा-या नव-याच्या इच्छेखातर पाच पाच सहा सहा मुलींना इथे जन्म दिला जातोय. सरकारची कुटुंबनियोजन मोहीमही अशा समाजात परिणामकारक राबलेली नाही . त्यामुळे जन्माला येऊन शिकू पाहणा-या नव्या पिढ़ीच्या मुलींचं आयुष्य मात्र हलाखीचं होतंय.आर्थिक परिस्थिती नसली तरी या मुलींना आहे त्या परिस्थितिशी टक्कर देत स्वत:च्या पायावर उभं रहायचंय. सिध्द करायचय की मुलगी ही मुलाईतकीच किंबहुना मुलापेक्षाही कर्तबगार होऊ शकते. पण कधीतरी मिळणारे सावित्रिबाई फुले योजनेचे तिन चारशे रुपये आणि मोफत पाठ्यपुस्तकं या पलीकडे मुलिंसाठी असलेल्या सरकारी योजना यांच्यापर्यंत पोहोचतच नाहीत.सावित्रीच्या लेकी वाचवणं हे जितकं महत्वाचं तितकच गरजेचं आहे. ते गरीब अशिक्षित कुटुंबाना कुटुंबनियोजनाचं महत्व पटवून देणं. त्यासाठी गर्भलिंगनिदान करणारी सोनोग्राफी सेंटर्स बंद करण्याबरोबरच सामाजिक सुधारणांवरही भर द्यायला हवा.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close