S M L
  • पश्चिम घाटाची शान वाढली

    Published On: Jul 2, 2012 03:19 PM IST | Updated On: Jul 2, 2012 03:19 PM IST

    02 जुलैजैवविविधतेनं समृद्ध असलेल्या पश्चिम घाटाला युनेस्कोनं पश्चिम घाटाला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिलाय. पश्चिम घाटाच्या संवर्धनासाठी जे प्रयत्न केले जातायत या प्रयत्नांना यामुळे उभारी मिळेल. पण पश्चिम घाट वाचवण्यासाठी सरकार काही ठोस अंमलबजावणी करणार आहे की नाही हा प्रश्न आहे. गच्च हिरवाईच्या डोंगररांगा... कोसळणारा पाऊस..दाट धुकं आणि धबधब्यांचा प्रदेश...भारतातल्या मान्सूनवर प्रभाव पाडणारा पश्चिम घाटाचा हा 1600 किलोमीटरचा लांबचलांब टापू, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तमिळनाडू आणि केरळमधल्या या भागाला आता जागतिक वारशाचा दर्जा मिळाला. त्यामुळे पुन्हा एकदा पश्चिम घाटाची वैशिष्ट्यं अवघ्या जगाच्या समोर आली. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये असलेलं कास पठार, कोयना, चांदोली आणि राधानगरीचं दाजीपूर अभयारण्य, आंबोली या ठिकाणांची दखल आता जागतिक पातळीवर घेतली गेलीय. त्याचबरोबर गोवा, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू या राज्यांतल्या समृद्ध जंगलांचाही यात अंतर्भाव आहे. पश्चिम घाटाच्या संवर्धनासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं आता जाहीर केला. पण, त्याच्या अंमलबजवाणीबद्दल केंद्र आणि राज्य सरकारं गंभीर नाहीत, अशी टीका या समितीचे अध्यक्ष माधव गाडगीळ यांनी केलीय. बेसुमार मायनिंग, येऊ घातलेले औष्णिक प्रकल्प, प्रदूषणकारी रासायनिक प्रकल्प यामुळे पश्चिम घाट धोक्यात आलाय. त्यामुळे फक्त या भागाला जागतिक वारशाचा दर्जा मिळवून देऊन भागणार नाही तर पश्चिम घाटाच्या संवर्धनासाठी पर्यावरण कायद्यांचीही काटेकोर अंमलबजावणी व्हायला हवी,असं पर्यावरण तज्ज्ञांचं मत आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close