S M L
  • अलविदा विलासराव

    Published On: Aug 15, 2012 04:28 PM IST | Updated On: Aug 15, 2012 04:28 PM IST

    आशिष जाधवसह माधव सावरगावे, बाभळगाव15 ऑगस्टमहाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना आज शासकीय इतमामात साश्र्‌ू नयनांनी अखेरचा निरोप दिला. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी बाभळगावात लाखोंचा जनसागर उसळला होता. पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह देशातील दिग्गज नेत्यांनी विलासरावांचं अंत्यदर्शन घेतलं.महाराष्ट्राचं उमदं नेतृत्व... दिलखुलास विलासरावांचं काल चेन्नईत निधन झालं आणि संपूर्ण राज्यात शोककळा पसरली. आज सकाळी विलासराव देशमुख यांचं पार्थिव चेन्नईहून निघालं तेव्हा विमानतळावर त्यांना चेन्नई पोलिसांनी सलामी दिली..विलासरावांच्या निधनाची बातमी आल्यापासूनच लातूर जणू स्तब्ध झालं होतं. बाभळगावात तर कालपासून चूलीही पेटल्या नाहीत. पहाटेपासूनच लातूरकर रस्त्याच्या दुतर्फा रांगा लाऊन विलासरावांची वाट पाहत होते. विलासरावांचं पार्थिव सकाळी चेन्नईहून लातूरात आणलं गेलं. लातूरकरांच्या चेहर्‍यावर पोरकेपणाचा भाव स्पष्टपणे दिसत होता.आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी लाखोंचा जनसागर बाभळगावात आला होता. यावेळी गावकर्‍यांना त्यांच्या भावना अनावर झाल्या..विलासरावांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्षा सोनिया ंगांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी आणि बॉलीवुड कलाकारांनी उपस्थिती लावली आणि देशमुख कुटुंबियांचं सांत्वन केलं.विलासराव त्यांच्या गढीवरून अखेरच्या प्रवासाला निघाले तेव्हा लाखोंचा जनसागर सद्गदीत झाला. शासकीय इतमामात डबडबलेल्या डोळ्यांनी विलासरावांना अखेरचा निरोप दिला.आणि 40 वर्षांपूर्वी बाभळगावातून निघालेलं विलासराव नावाचं तूफान आज त्याच बाभळगावात शांत झालं.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close