S M L

ललित मोदींचा गेम ओव्हर, BCCIने घातली आजीवन बंदी

Sachin Salve | Updated On: Sep 25, 2013 10:07 PM IST

ललित मोदींचा गेम ओव्हर, BCCIने घातली आजीवन बंदी

lalit modi25 सप्टेंबर :आयपीएलचे माजी कमिशनर ललित मोदी यांच्यावर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आजीवन बंदी घालण्यात आली आहे. आज बीसीसीआयच्या विशेष सर्वसाधारण सभेत अवघ्या 11 मिनिटांत हा निर्णय घेण्यात आला. बीसीसीआयच्या या बैठकीवर बंदी घालण्यात यावी अशी याचिका मोदी यांनी सर्वोच्च न्यायालयात केली होती.

 

पण मोदींची याचिका फेटाळात सर्वोच्च न्यायालयानं बीसीसीआयची ही अंतर्गत बाब असल्याचं म्हणत हस्तक्षेप करण्यास नकार दिला. आयपीएलच्या 2008 ते 2010 या कालावधीत आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप ललित मोदींवर ठेवण्यात आलाय. अरुण जेटली आणि ज्योतिरादित्य शिंदे यांच्या शिस्तपालन समितीनं मोदींविरोधात अहवाल तयार केला होता.

 

ललित मोदींवरचे आरोप

- आयपीएलच्या लिलावात घोटाळा, 2010 मध्ये दोन टीम्सना केली मदत

- कोची टीम विक्रीच्यावेळी कोचीच्या शिष्टमंडळावर दबाव आणल्याचा आरोप

- आयपीएलच्या पैशांची केली अफरातफर

- आयपीएलचे इंटरनेट आणि प्रदर्शनाच्या हक्कांमध्ये घोटाळा केल्याचा आरोप

- इंग्लंडमध्ये दुसरी टी 20 स्पर्धा सुरू करण्याचा प्रयत्न

 

BCCI चा निर्णय

 

"ललित मोदींवर आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर आरोप आहेत, त्यामुळे बोर्डाच्या नियमांनुसार त्यांच्यावर आजीवन बंदीची कारवाई करण्यात येतेय. बोर्डाचा अधिकारी म्हणून त्यांच्याकडून सर्व अधिकार काढून घेण्यात येतील. यानंतर मोदींना बोर्डाचं कोणतंही पद किंवा बोर्डाच्या कोणत्याही समितीचं सदस्यत्व भूषविता येणार नाही."

 

ललित मोदींची इनिंग

ललित मोदी ज्या वेगाने यशाच्या पायर्‍या चढले त्याच वेगाने त्यांची घसरण झाली. मोदींचा जन्म एका उद्योजक कुटुंबात झालाय. 2005मध्ये बीसीसीआयचा उपाध्यक्ष होईपर्यंत ललित मोदी हे नाव भारतीय क्रिकेटमध्ये फारसं कुणाला माहीतही नव्हतं. पण आल्या आल्याच मोदी यांनी पहिलं लक्ष वळवलं ते बीसीसीआयच्या आर्थिक उलाढालीत. बोर्डाचं उत्पन्न एक बिलियन अमेरिकन डॉलर्सच्या घरात गेलं. आणि बीसीसीआयमध्ये मोदी या नावाला वलय प्राप्त झालं.

 

पण ही फक्त सुरुवात होती. कारण, मोदींची खरी ओळख पटली त्यांनी सुरु केलेल्या इंडियन प्रिमिअर लीगमुळे..2007मध्ये सुरु झालेली ही लीग क्रिकेटमधला एक मोठा ब्रँड बनली. आणि बीसीसीआयसाठी सोन्याचं अंडं देणारी कोंबडी. देशातले बडे उद्योजक, बॉलिवूड स्टार आणि राजकीय नेतेही या लीगकडे आकर्षित झाले. तर जगातल्या अव्वल क्रिकेटरनाही देशासाठी खेळण्यापेक्षा आयपीएलमध्ये खेळणं फायद्याचं वाटू लागलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे करोडो क्रिकेट फॅन्सची संध्याकाळ क्रिकेट स्टेडिअम किंवा टीव्हीसमोर जाऊ लागली.

अर्थात क्रिकेटमधली मोदींची ताकद वाढली तसे त्यांचे विरोधकही वाढले. 'हम करे सो' कायदा या वृत्तीचा वरिष्ठ अधिकार्‍यांनाही त्रास व्हायला लागला. आणि हळूहळू बीसीसीआयमध्येच मोदी विरोधी गट तयार झाला. वसुंधरा राजेंचं सरकार पडल्यावर घरच्याच मैदानात मोदींच्या वर्चस्वाला पहिला धक्का बसला. मार्च 2009मध्ये राजस्थान क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोदी यांना मानहानीकारक पराभव पत्करावा लागला.

या निवडणुकीत त्यांच्या विरोधकांनी मोदींवर वैयक्तिक टीकाही केली. आणि ते ड्यूक विद्यापीठात शिकत असताना त्यांच्यावर झालेल्या फौजदारी गुन्ह्याचं भांडवल केलं. मोदी यांच्याकडे 400 ग्रॅम अंमली पदार्थ सापडले होते. आणि त्यासाठी अमेरिकेत त्यांच्या नावावर गुन्हा दाखल झाला होता. पण मोदींनी या विषयावर फारसं भाष्य केलं नाही. आणि तरुणपणी झालेली चूक म्हणत हा विषय नेहमी डावलला. आयपीएल यशस्वी करण्यासाठी त्यांनी अधिकच कंबर कसली.आयपीएलच्या दुसर्‍या हंगामात सुरक्षा पुरवायला केंद्र सरकारने नकार दिला. पण मोदी यांनी धडाडीने या स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत हलवल्या. आयोजनाच्या तयारीसाठी फक्त तीन आठवडे हातात असताना मोदींनी स्पर्धा तर घडवून आणलीच. शिवाय ती पहिल्या हंगामाइतकीच यशस्वीही केली.

भारतातच नाही तर जगातला एक प्रथितयश स्पोर्ट्स प्रशासक म्हणून नावलौकीक त्यांनी मिळवला. पण कोची टीमवरुन झालेला वाद, आयपीएलमध्ये बेटिंगचे आरोप आणि आयपीएल टीम्समध्ये मोदी कुटुंबीयांचा झालेला आर्थिक फायदा यामुळे या मोदी यांच्या नावाला बट्टा लागला.  आयपीएलच्या तिसर्‍या हंगामानंतर अखेर ललित मोदींची बीसीसीआयमधून उचलबांगडी करण्यात आली. आणि आज त्यांच्यावर आजीवन बंदी घालण्यात आलीय.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 25, 2013 03:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close