S M L

बाळासाहेबांचा पहिला स्मृतिदिन

Samruddha Bhambure | Updated On: Nov 18, 2013 07:04 PM IST

बाळासाहेबांचा पहिला स्मृतिदिन

17 नोव्हेंबर : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज पहिला स्मृतिदिन.  आपल्या लाडक्या साहेबांना आदरांजली वाहण्यासाठी राज्यातल्या कानाकोपर्‍यातून शिवसैनिक मुंबईत दाखल झाले होते.

1966साली बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. 17 नोव्हेंबरला देशाच्या इतिहासात गेली पाच दशक गाजवणारा सूर्य अखेर अस्ताला गेला. त्यांना निरोप देण्यासाठी दोनकोटींपेक्षा जास्त शिवसैनिकांचा शिवसागर शिवतीर्थावर लोटला होता. आज पुन्हा साहेबांच्या ओढीने राज्यभरातून असंख्य शिवसैनिक शिवाजी पार्कमध्ये दाखल झाले होते.

 

बाळासाहेबांचा जीवनप्रवास

बाळ केशव ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक वादळ…शिवसेनेचे संस्थापक आणि शिवसेनाप्रमुख असलेल्या बाळासाहेबांचा जन्म 23 जानेवारी 1926 ला पुण्यात झाला. त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात 1950ला ते फ्री प्रेस जर्नलमध्ये व्यंगचित्रकार म्हणून झाली. या काळात त्यांची राजकीय व्यंगचित्र खूपच गाजली. पुढे वैशिष्ट्य ठरलेल्या त्यांच्या तिरकस भाषणशैलीचं मुळ त्यांच्या या भुतकाळात आहे असं म्हटल्यास ते वावगं ठरू नये. बाळासाहेबांचे वडील केशव सीताराम ठाकरे म्हणजेच प्रबोधनकार ठाकरे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतलं एक मोठं नाव. त्यामुळे पुरोगामित्व आणि सामाजिक जाणिवेचा वसा त्यांना घरातूनच मिळाला. शिवसेनेच्या स्थापनेपुर्वी त्यांच्या जीवनातला एक महत्वाचा टप्पा म्हणून मार्मिक या साप्ताहिकाचा उल्लेख करावा लागेल. 1960 साली बाळासाहेबांनी सुरू केलेल्या या व्य्ंागचित्र साप्ताहिकातलं ' वाचा आणि स्वस्थ बसा ' हे सदर तर त्या काळी खूपच गाजलं. या साप्ताहिकानं एक वेगळंच राजकीय वातावरण तयार केलं. 19 जून 1966 साली भूमिपुत्रांच्या न्याय हक्कांसाठी शिवसेनेची स्थापना झाली. 'बजाव पुंगी हटाव लुंगी' ही शिवसेनेची घोषणाही बरीच गाजली.

सुरूवातीला शिवसेनेनं दाक्षिणात्यांना टार्गेट केलं. अनेक कंपन्या आणि व्यवसायात असलेलं दाक्षिणात्यांचं प्राबल्य आणि त्यामुळे मराठी माणसाला होत असलेला त्रास हा प्रमुख मुद्दा शिवसेनेनं हिरीरीनं मांडला. सुरूवातीच्या काळात एक सामाजिक संघटना असलेल्या शिवसेनेचं पुढे राजकीय पक्षात रुपांतर झालं. 1985 नंतरच्या काळात हिंदुत्व आणि राष्ट्रवादाची भूमिका प्रखर करत शिवसेनेनं राजकारणावर भर दिला. 1995 ते 99 हा काळ बाळासाहेबांच्या राजकीय कारकिर्दीतला महत्वाचा काळ म्हणावा लागेल. शिवसेना भाजप युतीचं सरकार महाराष्ट्र विधानसभेत सत्तेवर आलं. आणि बाळसाहेब होते या सरकारचे रिमोट कंट्रोल. शिवसेनेच्या स्थापनेपासून बाळासाहेबांची अनेक वक्तव्यं वादग्रस्त ठरली. मग त्यात दाक्षिणात्य, गुजराती, बिहारी यांना केलेला विरोध असो, किंवा उघडपणे केलेली हिटलरची प्रशंसा, बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी केलेलं समर्थनाचं विधान असो वा अफझल गुरूच्या संदर्भात तत्कालीन राष्ट्रपती कलाम यांच्यावर केलेली टीका असो बाळासाहेब कायम त्यांच्या अशा वक्तव्यामुळे चर्चेत राहिले. त्यांच्या शब्दांना तलवारीसारखी धार होती. म्हणूनच त्यांच्या वक्तृत्वानं आणि लेखणीनं अनेकांना घायाळ केलं.लाखो तरुणांना शिवसेनेच्या झेंड्याखाली आणलं… महाराष्ट्राचा गेल्या पाच दशकांचा इतिहास लिहायचा झाल्यास बाळासाहेब ठाकरे या आठ अक्षरांना टाळून पुढे जाता येणार नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 17, 2013 08:55 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close