S M L

राष्ट्रवादीच्या 14 उमेदवारांची यादी निश्चित?

Sachin Salve | Updated On: Jan 13, 2014 10:43 PM IST

Image img_232402_ncp52353_240x180.jpg13 जानेवारी : लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या 14 उमेवारांची यादी निश्चित झाली आहे. तर 7 ते 8 जागांबाबत अजून काही निर्णय झालेला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीला काँग्रेसकडच्या चार जागा हव्यात. याबाबत लवकरच काँग्रेसबरोबर वाटाघाटी सुरू करण्यात येणार आहेत.

बैठकीत रावेर, हातकणंगले, अमरावती या जागांच्या अदलाबदलीवर चर्चा झाली. रावेर, हातकणंगले, अमरावती आणि काँग्रेसने मागणी केल्यास हिंगोली, या जागांची अदलाबदल करायला राष्ट्रवादी तयार असल्याची माहिती मिळतेय. तर राष्ट्रवादीचा काँग्रेसच्या कोट्यातल्या यवतमाळ-वाशिम आणि रायगड या 2 जागांवर डोळा आहे. मिळालेल्या माहितीवरून कोल्हापूरच्या लोकसभा जागेवरून वाद होऊ शकतो. सध्या ही जागा अपक्ष निवडून आलेल्या सदा शिवराव मंडलिक यांच्याकडे असून ते काँग्रेसचे सहयोगी सदस्य आहेत. पण, राष्ट्रवादी ही जागा काँग्रेसला सोडायला तयार नाही. म्हणूनच या जागेवरून आघाडीत पेच निर्माण होईल, असं आतापासूनच बोललं जातंय.

दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीत विदयमान आठ जागांपैकी माढाबरोबरच आणखी एखाद-दुसर्‍या जागेवर नवा चेहर्‍याला संधी दिली जाईल, असं आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी जाहीर केलंय. दरम्यान, राष्ट्रवादीच्या आजच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य सरकार काम करत नसल्याचे खापर राष्ट्रवादीवर फुटू नये, यासाठी आपण बाहेर पडून बाहेरून पाठिंबा देऊ, वेळ पडली तर स्वतंत्र लोकसभा लढवू, असं मत मांडलं. पण त्याला शरद पवारांनी नकार दिल्याचं कळतंय. पण, प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी मात्र याविषयी कुठलीही चर्चा आज झाली नाही, असं म्हटलं आहे.

आता राष्ट्रवादीने आपल्या उमेदवारीची यादी निश्चित करून काँग्रेसच्या कोर्टात चेंडू टोलवला आहे. आता काँग्रेसला आपली यादी तयार करावी लागणार आहे. त्यामुळे यापुढे आता राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये समन्वयाची बैठक होणार आहे. आघाडीचा धर्म पाळत जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी दोन्ही पक्षांकडून प्रयत्न होणार आहे.

चर्चेतली नावं

  • रावेर - राष्ट्रवादी काँग्रेस
  • हातकणंगले - राष्ट्रवादी काँग्रेस
  • अमरावती - राष्ट्रवादी काँग्रेस
  • हिंगोली - राष्ट्रवादी काँग्रेस
  • कोल्हापूर - काँग्रेस समर्थित अपक्ष
  • रायगड - काँग्रेस
  • यवतमाळ-वाशिम - काँग्रेस
  • औरंगाबाद - काँग्रेस

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 13, 2014 04:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close