S M L

नामदेव ढसाळ यांचा जीवनप्रवास

Samruddha Bhambure | Updated On: Jan 15, 2014 03:15 PM IST

नामदेव ढसाळ यांचा जीवनप्रवास

15 जानेवारी : आपल्या काव्य प्रतिभेने मराठी काव्याचा चेहरामोहरा बदलवून मराठी काव्य विश्वाला हादरा देणारे बंडखोर कवी आणि दलित पँथर या झुंझार संघटनेच्या माध्यमातून दलित अत्याचार विरोधात युद्ध पुकारणारे नेते नामदेव ढसाळ यांच्या व्यक्तीमत्त्वावर टाकलेला हा दृष्टीक्षेप.

“रक्तात पेटलेल्या अगणित सुर्यांनो…”रक्तात पेटलेल्या अगणित सुर्याना हाकारत अंधारयात्रिक होण्याचं ठामपणे नाकारणारा बंडखोर कवी म्हणजे नामदेव ढसाळ. ढसाळ म्हणजे जातीयवादाचे लचके तोडण्यासाठी सर्वशक्तीनिशी झेपावलेला पँथर…केवळ मराठीच नाही तर जागतिक साहित्य विश्वावर आपली शैलीदार मोहोर उठवणार्‍या या कवीचा जन्म 1949 च्या फेब्रुवारीत पुण्याजवळच्या एका खेड्यात झाला. दलित कुटुंबात जन्मलेल्या ढसाळांचं बालपण मुंबईतल्या गोलपिठा या वेश्यावस्तीत गेलं. लुंपेनवर्गाच्या समाजात ढसाळांचं बालपण अत्यंत हालाखीच्या स्थितीत गेलं.

मुंबईतल्या वेश्यावस्तीतलं बकालपण, नाकारलेपण आणि उध्वस्तपणाचा उद्रेक घेऊन नामदेव ढसाळांचा गोलपिठा हा धगधगीत काव्यसंग्रह मराठी साहित्यात अवतरला आणि त्यानं मराठी विश्वाला धक्का दिला. मराठी काव्याचे मापदंड बदलून टाकले. प्रस्थापित साहित्यप्रांतात दलित आणि लुंपेनवर्गाची जळजळीत, बंडखोर भाषा नव्यानं दाखल झाली आणि मराठी साहित्य विश्वाला नाकारलं गेलेल्या जगाचं प्रतिनिधीत्व कऱणारा ढसाळांच्या रुपात बंडखोर कवी मिळाला.

गोलपिठानंतर ढसाळांचे ‘मुर्ख म्हातार्‍याने डोंगर हलवले’, ‘आंबेडकरी चळवळ’, ‘तुही यंता कंची’, ‘खेळ’, ‘प्रियदर्शिनी’, ‘या सत्तेत जीव रमत नाही’, ‘गांडू बगीचा’, ‘मी मारले सुर्याच्या रथाचे सात घोडे’, ‘तुझे बोट धरून मी चाललो आहे’ असे काव्यसंग्रह येत गेले आणि ढसाळांची असामान्य प्रतिभा जगाला परिचित होऊ लागली. ढसाळांच्या कवितांचं अनेक परदेशी भाषांमध्येही भाषांतर कऱण्यात आलं.

नामदेव ढसाळ यांनी आपल्या कवितेच्या माध्यमातून ज्या प्रमाणं बंड करायला सुरू केलं, त्याच काळात कविता हे राजकारणच आहे असं म्हणत ढसाळ यांनी 1973 ला अमेरिकेतल्या ब्लॅक पँथरच्या धर्तीवर दलित पँथर ही क्रांतीकारी संघटना स्थापन केली. दलितांवरच्या वाढत्या अत्याचाराचा मुकाबला करण्यासाठी दलित चळवळ प्रभावी ठरत नाही त्यासाठी क्रांतीकारी चळवळ उभारण्याच्या दृष्टीनं ढसाळांनी हे पाऊल उचललं. ही तरुणांची चळवळ होती. जिथं जिथं दलितांवर अत्याचार होत होता, तिथं तिथं ही संघटना संघर्षासाठी धावून जात होती.

रस्त्यावर उतरून संघर्ष करणं आणि अत्याचाराला विरोध करणं हे दलित पँथरचं वैशिष्ठ्य. 70 आणि 80 च्या दशकात महाराष्ट्राच्या राजकाराणात आणि सामाजिक जीवनात मोठी खळबळ उडवून देणार्‍या या चळवळीनं मोठा दबदबा निर्माण केला. पण पुढं या चळवळीत अनेक कारणानं फुट पडली. चळवळीचा नेता म्हणून ढसाळांनी अनेक धक्कादायक निर्णय घेतले. ढसाळांनी सामाजिक, राजकीय जीवनात काहीही निर्णय घेतले असतील पण त्याचं सामाजिक चळवळ आणि साहित्य प्रांतातलं स्थान कायम आबाधित राहिल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 15, 2014 02:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close