S M L

मुंबईकरांना मिळाली नवी 'लाईफलाईन', मोनोरेल उद्यापासून सेवेत

Sachin Salve | Updated On: Feb 1, 2014 10:19 PM IST

मुंबईकरांना मिळाली नवी 'लाईफलाईन', मोनोरेल उद्यापासून सेवेत

3457mono 345634601 फेब्रुवारी : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित अशी देशातील पहिली आणि जगातील दुसरी सर्वात लांब मोनोरेल आता मुंबईकरांची झाली आहे. आज (शनिवारी) दुपारी देशातल्या पहिल्यावहिल्या मोनोरेलचं उद्घाटन दिमाखात पार पडलं.

राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वडाळा ते चेंबूर या पहिल्या टप्प्याला हिरवा झेंडा दाखवला आहे. आणि उद्या सकाळी 7 वाजेपासून मुंबईकरांना मोनोरेलमधून प्रत्यक्ष प्रवास करता येणार आहे.मोनोरेलला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर वडाळा ते चेंबूर असा प्रवास मुख्यमंत्र्यांसह उपस्थित सगळ्यांनी केला. अत्यंत किफायतशीर दरात चेंबूरपर्यंतचा हा प्रवास करता येणार आहे.

सुरुवातीला सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मोनोरेल 15 मिनिटांच्या अंतराने धावणार आहे. मोनोचा पहिला टप्पा हा चेंबूर ते वडाळा असा असून हा पहिला टप्पा 8.90 किलोमीटर इतका आहे. एकूण 19.54 कि.मी. मार्गावर मोनो धावणार आहे. या पहिल्या टप्यात वडाळा डेपो, भक्ती पार्क, म्हैसूर कॉलनी, भारत पेट्रोलियम, एफटी, व्हीएनआर जंक्शन, चेंबूर स्टेशन्स असे सात स्टेशनवर प्रवास करता येणार आहे. विशेष म्हणजे मोनोचे तिकीट हे किमान 5 रुपये आणि जास्तीत जास्त 11 रुपये असणार आहे.

जगातील सर्वात लांब मोनोरेल ही जपानमधील ओसाका मोनो रेल आहे. ओसाका मोनो रेल ही 23.8 कि.मी. मार्गावर धावते. ओसाका मोनो रेलच्या उभारणीसाठी तब्बल 12 हजार 690 कोटी खर्च करण्यात आलाय. तर मुंबईच्या मोनो रेलसाठी 1200 कोटी खर्च करण्यात आलाय. सध्या चार डबे असलेल्या मोनोरेलच्या एका डब्यातून दुसर्‍या डब्यात जाता येणार नाही. एका डब्यात 20 प्रवाशांना बसून आणि 130 प्रवाशांना उभ्याने प्रवास करता येईल. मुंबईकरांच्या सेवेसाठी मोनोरेलचा एकूण 250 कर्मचार्‍यांचा स्टाफ आहे. एकंदरीतच वाहतुकीची कोंडी, लोकलच्या गर्दीला टाळून वातानुकुलित अशा मुंबई मोनोरेलने आरामात प्रवास करणार आहे.

मुंबईकरांची मोनोरेल

- मोनोचा पहिला टप्पा चेंबूर ते वडाळा

- पहिला टप्पा 8.90 किलोमीटरचा आहे

- पहिल्या टप्यात वडाळा डेपो, भक्ती पार्क, म्हैसूर कॉलनी, भारत पेट्रोलियम, एफटी, व्हीएनआर जंक्शन, चेंबूर स्टेशन्स

- मोनोचं तिकीट किमान 5 रु. जास्तीत जास्त 11 रु.

- भारतातला हा पहिला मोनो प्रकल्प

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 1, 2014 06:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close