S M L

सरकारचं टोल धोरण जाहीर होईपर्यंत टोल भरू नका -राज ठाकरे

Sachin Salve | Updated On: Feb 14, 2014 01:39 PM IST

Image raj_on_thane_band_300x255.jpg 13 फेब्रुवारी : जोपर्यंत राज्य सरकार टोल विरोधात धोरण जाहीर करत नाही तोपर्यंत टोलविरोधात मनसेचं आंदोलन सुरूच राहिल. टोल देणार नाही आणि राज्यातील जनतेनंही टोल भरू नये जर कुठे टोल नाक्यावर जबरदस्तीने वसुली केली तर त्या टोल नाक्याच्या  कंत्राटदाराच्या घरी जाऊन थैमान घालू असा थेट इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला. तसंच मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा झाली असून टोल विषयी लवकरच धोरण जाहीर करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिलीय. त्यामुळे 21 फेब्रुवारीचा मोर्चा तुर्तास स्थगित करत आहोत असंही राज यांनी जाहीर केलं.

राज्यभरात 'टोल'फोड आणि रास्ता रोको आंदोलनानंतर आज गुरुवारी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारसोबत चर्चा केली. आज सकाळी राज ठाकरे आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यात सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पार पडली. या बैठकीत काय झालं, कोणते निर्णय घेण्यात आले याचा खुलासा राज यांनी पत्रकार परिषद घेऊन केला. यावेळी त्यांनी राज्यभरात टोल नाक्यांसंबंधी पुरावे सादर केले.

शेजारील कर्नाटकाच्या तुलनेत महाराष्ट्रात जास्त टोल आकारला जातो. तिकडे मोठमोठे रस्ते बांधूनही तिकडचं सरकार टोल लावत नाही, मग महाराष्ट्रात 10 कोटींपेक्षा कमी असलेले टोल नाके का चालवले जातात? असा सवाल राज यांनी उपस्थित केला. सरकारची परवानगी नसतानाही वर्धा नदीवर बेकायदा टोल आकारला जातो हे राज यांनी निदर्शनास आणून दिलं.

तसंच संपूर्ण राज्यात टोल नाक्यांवर बाथरुम दिसत नाही. मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर दोन टोल नाके सोडले तर इतर कुठेच दिसत नाही. महामार्गांवर इतके अपघातात घडतात. आजपर्यंत लाखो लोकांना हकनाक बळी गेलाय पण सरकारचे आदेश असतानाही टोल नाक्यांवर कुठल्याही प्रकारची इमर्जन्सी सर्व्हिस नाही, ऍम्ब्युलन्स नाहीत. याबद्दल मुख्यमंत्र्यांना विचारले तर आमच्याकडून चूक झाली असं मोघम उत्तर देतात, मग आतापर्यंत हायवेवर अपघातात बळी गेल्या त्यांचं काय ? असा संतप्त सवालही राज यांनी केला.

आजच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी आचारसंहिता लागण्याच्या आता टोलचं धोरण लागू करणार आहे. बीओटी धोरणात चुका, त्यात सुधारणा आणणार आहे आणि 1 कोटी 50 लाख ते 10 कोटींपर्यंतचे टोलनाके बंद करण्याचा निर्णय लवकरच घेऊ असं आश्वासन दिलं आहे. मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा झाली. सरकार टोलबाबत निर्णय घेण्याच्या तयारीत दिसतंय. पण अशी आश्वासनं अनेक वेळा मिळाली.

अण्णा हजारे यांनीही टोल बंद करण्याची मागणी केली पण सरकारने आश्वासनापलीकडे काही केलं नाही. म्हणून आंदोलन सुरूच राहणार असून टोल देणार नाही. राज्यातील जनतेनंही टोल देऊ नये आणि जर कोणत्याही टोल नाक्यांवर जबरदस्तीने लोकांकडून टोल वसूल केला गेला तर टोल नाक्यांच्या कंत्राटदाराच्या घरी थैमान घालू असा इशारा राज यांनी दिला. टोल फोड केली तर आमच्यावर टीका होते. आंदोलन शांततेनं केलं तरी टीका होते. मग करायचं काय ? असा सवालही राज यांनी उपस्थित केला.

राज ठाकरेंची सरकारकडे मागणी

 

 • - मनसेचं टोलविषयक धोरण सरकारसमोर सादर
 • - मुंबईच्या एन्ट्री पॉईंटला टोल ठिक आहे पण एक्झिट पॉईंटला टोल का लावला जातो ?
 • - 22 टोल नाक्यांवर टोल लावण्याची गरज नाही, ते बंद करा- 22 टोल नाक्यांची यादी केली सादर
 • - मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे सोडला तर एकाही टोल रस्त्यांवर शौचालय नाहीत
 • - महाबळेश्‍वर आणि लोणावळयात प्रदूषण टॅक्स का लावला जातो
 • - खेड-शिवापूर NH1 टोल नाक्याची मुदत संपली, हा टोल नाका बंद करण्याची शिफारस केंद्राकडे करणार
 • - किती किलोमीटरवर टोलनाके असावेत यासंबंधी कोणतेही नियम सरकारकडे नाहीत

मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण

 

 • - टोल धोरणाचा नवीन मसुदा तयार
 • - 15 दिवसांपूर्वी इन्फ्रास्ट्रक्चर सब कमिटीमधे मांडलाय
 • - MSRDCचे आतापर्यंत 36 टोलनाके बंद करण्यात आलेत
 • - हायकोर्टाच्या मान्यतेनुसार टोलचे दर आणि वुसलीचा कालावधी ठरवण्यात आलाय
 • - टोल रस्त्यावर ट्रॉमा सेंटर आणि हेलिपोर्ट उभारणार
 • - जिथं टोल वसुली संपली आहे, तिथलं बांधकाम पाडलं जाणार
 • - नवीन टोल धोरण लोकसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी जाहीर करणार

असं असणार सरकारचं नवं टोल धोरण

 

 •  - किलोमीटरवर नाही तर प्रकल्पाच्या किंमतीवर टोल वसुली होणार (NEW)
 • - एस.टी. बसेसना टोल माफ करणार
 • - टोलच्या रस्त्यांवर शौचालयं उभारणं बंधनकारक करणार
 • - सध्याच्या टोलनाक्यांवरही शौचलयं बांधणार
 • - इलेक्ट्रॉनिक सर्व्हेलन्सच्या माध्यमातून गाड्यांचा डाटा गोळा करणार
 • - राज्यातले काही टोल बंद करणार
 • - ई-महापास योजना लागू करणार
 • - नवं टोलधोरण सर्व टोलनाक्यांना लागू होणार
 • - महामार्गांवर ऍम्ब्युलन्स तैनात करणार
 • - 20 कोटींच्या आतले 25 ते 30 टोलनाके बंद करणार
 • - वादग्रस्त टोलनाक्यांचा आढावा घेणार

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 13, 2014 03:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close