S M L

नाराज विजय कांबळे आणि जावेद अहमद सुट्टीवर

Sachin Salve | Updated On: Feb 18, 2014 11:45 AM IST

नाराज विजय कांबळे आणि जावेद अहमद सुट्टीवर

javed ahamad and vijay kamble17 फेब्रुवारी : नेहमी कोणत्या ना कोणत्या गुन्ह्यामुळे आणि गुन्ह्यांची उकल केल्यामुळे चर्चेत असलेलं मुंबई पोलीस दल सध्या वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहे. मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी राकेश मारियांची नियुक्ती झाली खरी, पण त्यामुळे अनेक वादांना तोंडही फुटलंय. नाराज विजय कांबळे आणि जावेद अहमद सुट्टीवर गेले आहे. त्यांनी सुट्टीचा अर्ज महासंचालकांकडे पाठवला आहे. सुट्टीचा कालावधी मात्र नमूद केला नाही.

सेवाज्येष्ठता डावलल्यामुळे विजय कांबळे नाराज झाले असून त्यांनी ठाण्याचं आयुक्तपद नाकारलंय. तसंच महामार्ग पोलीस विभागाचे अतिरिक्त महासंचालक असलेल्या विजय कांबळेंनी रजेवर जाण्याचा निर्णय घेतल्याचं समजतंय. मुंबईच्या आयुक्तपदी असलेल्या अधिकार्‍याहून कनिष्ठ अधिकारी ठाण्याच्या आयुक्तपदी नेमण्याचा प्रघात आहे.

पण मारियांपेक्षा सेवाज्येष्ठता असूनही आयुक्तपद न मिळाल्यानं कांबळे नाराज असल्याची चर्चा आहे. त्यांच्याबरोबर जावेद अहमदही मारियांच्या नियुक्तीनं नाराज झाले आहेत. तर विजय कांबळेंना डावलण्याचं राजकारण झाल्याचा आरोप भाजपचे नेते विनोद तावडेंनी केलाय. या सर्व प्रकारामध्ये अप्रत्यक्षरीत्या जातीचंही राजकारण घुसल्यामुळे हे सर्व प्रकरण आणखी गढूळ झालंय.

नियुक्तीत कोणताही घोळ नाही -मुख्यमंत्री

दरम्यान, राज्यातल्या पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्यांबाबत कोणताही घोळ नसून बदल्या या कायद्याप्रमाणंच झाल्या असल्याचं स्पष्टीकरणही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलंय. तर पोलीस आयुक्तांची नेमणूक करताना पात्रता पाहिली जाते, जात नाही असं गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी स्पष्ट केलंय. तसंच मुंबईच्या आयुक्तपदासाठी तीन अधिकारी पात्र होते, असं सांगून विजय कांबळे यांच्या क्षमतेविषयी शंका नसल्याचं अप्रत्यक्षरीत्या सांगितलं.

शहीद अशोक कामटेंच्या पत्नीही नाराज

26/11च्या अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेले अशोक कामटे यांच्या पत्नी विनीता कामटे यांनीही राकेश मारिया यांच्या पोलीस आयुक्तपदी झालेल्या निवडीबद्दल नाराजी व्यक्त केलीय. कामटे यांच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरणार्‍या त्रुटींचा तपास सध्या पोलीस करत आहेत. पण, मारिया यांच्या नियुक्तीमुळे हा तपास प्रभावित होईल, अशी भीती विनीता कामटे यांनी व्यक्त केलीय. 2009 साली मारिया पोलीस कंट्रोल रूमचे इन्चार्ज होते. हल्ल्याच्या रात्री पोलीस कंट्रोल रूम आणि कामटे यांच्या व्हॅनमध्ये वायरलेसवरून सतत संपर्क होता. कामा हॉस्पिटलमध्ये अतिरेक्यांच्या हल्ल्यात अशोक कामटे शहीद झाले होते. पण, आपण कामटेंना कामा हॉस्पिटलमध्ये जाण्याचे आदेश दिले नव्हते, असं मारिया यांनी सांगितलंय. पण, वायरलेसवरून झालेल्या संवादामध्ये विसंगती असल्याचं विनीता कामटे यांचं म्हणणं आहे. या प्रकरणात मारिया पारदर्शकपणे काम करतील, असं आपल्याला वाटत नाही, असा आरोपही विनीता यांनी केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 17, 2014 07:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close