S M L

राज ठाकरे गडकरींची ऑफर नाकारणार?

Sachin Salve | Updated On: Mar 4, 2014 03:54 PM IST

राज ठाकरे गडकरींची ऑफर नाकारणार?

gadkari meet raj04 मार्च : नितीन गडकरी आणि राज ठाकरे यांच्या गुप्त भेटीनं राज्यातलं राजकारण ढवळून निघालंय. गडकरींनी राज ठाकरेंना महायुतीला मदत करण्याचं आवाहन केलं. या ऑफरमुळे महायुतीत अस्वस्थता निर्माण झाली आहे. पण राज ठाकरे गडकरींची ऑफर नाकारण्याची शक्यता आहे. मनसे लोकसभेच्या सर्व जागा लढवू शकतं आणि लोकसभेची मनसेची यादी तयार आहे, असं मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर यांनी सांगितलंय.

नाशिकमध्ये गोदापार्कच्या भेटीनंतर भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांनी सोमवारी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईत एका पंचातारांकीत हॉटेलमध्ये भेट घेतली. या भेटीत लोकसभा निवडणूक लढवू नका असं आवाहन गडकरी यांनी राज यांना केलंय. तसंच मनसेला महायुतीत घेण्याचा प्रयत्न करणार असा इरादाही गडकरींनी व्यक्त केला.

पण गडकरींच्या या ऑफरमुळे महायुतीत अस्वस्थता निर्माण झालीये. सगळ्यांत तिखट प्रतिक्रिया अपेक्षेप्रमाणे शिवसेनेकडून आली. मनसेशी चर्चेचे सगळे दरवाजे बंद आहेत असं त्यांनी स्पष्ट केलं. तसंच गडकरींच्या या भेटीमुळे मतदारांमध्ये चुकीचा संदेश जाईल असं त्यांनी स्पष्टपणे मित्रपक्षाला बजावलं. गडकरींनी आम्हाला विश्वासात घ्यायला हवं होतं, असं आठवलेंनी म्हटलंय. तर दुसरीकडे, सोमवारी रात्र देवेंद्र फडणवीस यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

मुंडेंनी मारली बैठकीला दांडी

भाजपमधला मुंडे गट मात्र या घडामोडींमुळे अस्वस्थ आहे. या सर्व घडामोडींवर चर्चा करण्यासाठी भाजपनं बैठक बोलावली होती. पण मुंडे हजर नसल्यामुळे ही बैठक रद्द करण्यात आली. भाजपचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्या निवास्थानी ही बैठक होणार होती. मुंडेच नाहीत तर चर्चा कुठल्या मुद्द्यावर करायची ? हा पेच भाजपच्या नेत्यांमध्ये निर्माण झाला होता. भाजपचे नेते पांडुरंग फुंडकर, मुनगंटीवार, विनोद तावडे, देवेंद्र फडणवीस बैठकीला हजर राहणार होते.

भाजपमधील कम्युनिकेशन गॅप कारणीभूत -उद्धव ठाकरे

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी सेनेचं मुखपत्र सामनामधून नितीन गडकरींच्या शरद पवार आणि राज ठाकरे यांच्याशी असलेल्या जवळिकीवर जळजळीत टीका केलीये. "शिवसेना-भाजप-रिपाइं सर्वच घटकपक्ष एकत्र आले आहेत. अशा परिस्थितीत काँग्रेस-राष्ट्रवादीचा प्रचार जर कोणी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या करत असेल तर त्याला जनता माफ करणार नाही. भाजपमधून जर कोणी सत्ताधारी नेत्यांवर स्तुतीसुमनं उधळत असेल तर त्याला भाजपमधील कम्युनिकेशन गॅप कारणीभूत आहे.'' गडकरींनी केलेल्या राज ठाकरे यांच्या स्तुतीबद्दल ''हा भाजपचा अंतर्गत प्रश्न, महायुती काँग्रेस- राष्ट्रवादीचं सरकार उखडून काढण्यास कटिबद्ध आहे ''

कुणाचीही भेट घेऊ शकतो -गडकरी

या सगळ्या प्रकरणावर नितीन गडकरींनी ठाम भूमिका घेत प्रतिक्रिया दिली. आपण कुणाचीही भेट घेऊ शकतो, कुणी नाराज होण्याचं कारण नाही, असं गडकरी यांनी ठणकावून सांगितलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 4, 2014 03:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close