S M L

मनसे महाराष्ट्राची वाट लावेल -उद्धव ठाकरे

Sachin Salve | Updated On: Mar 15, 2014 09:52 PM IST

udhav on raj15 मार्च : मनसे आणि शिवसेनेत उठलेलं वादळ अजूनही शमलेलं नाही. मनसेला स्वतःचं अस्तित्व नसून मनसेला महाराष्ट्राची वाट लावायची आहे अशी घणाघाती टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसेवर केलीय. तसंच मनसेनं आधी बाळासाहेब ठाकरे यांचा आणि आता नरेंद्र मोदींचा मुखवटा घेतला आहे अशी जळजळीत टीकाही उद्धव यांनी केली. मनसेनं लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेनेविरोधात उमेदवार उतरवल्यामुळे उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंवर घणाघाती टीका केलीय. मातोश्रीवर माध्यमांशी बोलताना उद्धव यांनी मनसेवर टीका केली.

नितीन गडकरी आणि राज ठाकरे यांच्या भेटीमुळे महायुतीत चांगलीच महाधुसफूस झाली होती. एवढंच नाही तर विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपच्या नेत्यांनी 'कृष्णकुंज'वारी केल्यामुळे उद्धव ठाकरे चांगलेच संतापले होते. त्यामुळे त्यांनी थेट भाजपला धारेवर धरत खडा सवाल विचारला होता. एवढंच नाही तर मित्रांना सांभाळा नाही तर जनतेकडून तुमच्या डोक्यात धोंडा पडेल अशी टीकाही सेनेनं केली.

पण भाजपच्या 'राज'कारणामुळे उद्धव आणि राज पुन्हा आमनेसामने आले. मतांचं विभाजन होऊ नये यासाठी गडकरींनी पुढाकार घेतला. पण राज यांनी 'पत्ते पर पत्ता' टाकत लोकसभेच्या रिंगणात उमेदवार उतरवले आणि उमेदवार निवडून आले तर नरेंद्र मोदींना पाठिंबा देतील असं जाहीर करुन टाकलं. विशेष म्हणजे मनसेच्या सात उमेदवारांपैकी सहा उमेदवार हे शिवसेनेच्या विरोधात रिंगणात उतरले आहे. राज यांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले पण 'राज'नीतीमुळे सेनेच्या गोटात आणखी खळबळ उडालीय. त्यामुळे उद्धव यांनी भाजपच्या आड मनसेवर टीकास्त्र सोडले.

भाजपकडून दिवंगत नेते प्रमोद महाजन यांची मुलगी पूनम महाजन यांना उमेदवारी जाहीर केली. आज पूनम महाजन यांनी 'मातोश्री'वर जाऊन उद्धव यांची भेट घेतली यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना उद्धव यांनी पुन्हा मनसेवर टीका केली. मनसे आता संपलीय. मनसेला स्वतःचं अस्तित्व नसून मनसेला महाराष्ट्राची वाट लावायची आहे अशी घणाघाती टीका उद्धव यांनी केली. पक्ष स्थापन करते समयी राज ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मुखवटा चढवला होता. पण बाळासाहेबांनी फटकारून काढल्यामुळे तो उतारावा लागला. आता आपली ताकद संपत चाललीय हे लक्ष्यात आल्यावर त्यांनी भाजपशी छुपी हातमिळवणी केली. निवडणुकीसाठी त्यांनी आता नरेंद्र मोदींचा मुखवटा चढवला आहे अशी जळजळीत टीकाही उद्धव यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 15, 2014 03:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close